अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):- नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथील श्री गोरक्षनाथ गडावर श्री गोरक्षनाथ महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या धार्मिक उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संपूर्ण गड परिसर ‘श्री गोरक्षनाथ महाराज की जय’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. तसेच गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्टच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
प्रकट दिनानिमित्त मंदिर परिसराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. पहाटेपासूनच भाविकांनी श्री गोरक्षनाथ महाराजांच्या दर्शनासाठी गडावर गर्दी केली होती. दिवसभर भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ह.भ.प. शंतनू महाराज लांबे यांची कीर्तनसेवा संपन्न झाली. त्यांनी आपल्या कीर्तनातून श्री गोरक्षनाथ महाराज यांच्या प्रकट दिनाचे महत्त्व विशद करत भक्तांना आध्यात्मिक विचारांची शिकवण दिली. कार्यक्रमानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महापालिका आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, श्री गोरक्षनाथ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. प्रकट दिनाच्या पवित्र पर्वावर माझ्या हस्ते महाआरती आणि गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्टच्या वेबसाईटचे उद्घाटन होणे हा आनंदाचा क्षण आहे. देवस्थानच्या माध्यमातून गोरक्षनाथ गडाच्या विकासासाठी विविध कामे करण्यात आली असून, या कामांमुळे गडाच्या परिसरात सकारात्मक बदल घडून आला आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा अत्यंत मोठी असून, तिचे मूळ नाथ संप्रदायाशी जोडलेले आहे. देवस्थानच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. गोशाळेच्या माध्यमातून सुरू असलेले पुण्याचे कार्यही उल्लेखनीय आहे. प्रकट दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करून देवस्थानने सामाजिक बांधिलकी जपली आहे, असे त्यांनी सांगितले.
यंदा पर्जन्यमान कमी झाल्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याची बचत करणे अत्यंत गरजेचे आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत पाण्याची अधिक गरज भासणार असल्याने आतापासूनच पाण्याचा जपून वापर करावा. पुढील काही महिने कठीण परिस्थितीचे असू शकतात. पुढील वर्षी पाऊस किती पडेल, हे आताच सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने उपलब्ध असलेला पाणीसाठा जपून वापरण्याची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन आयुक्त डांगे यांनी केले.
आयुक्त यशवंत डांगे यांनी यावेळी या परिसरातील आपल्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. ते म्हणाले की, राहुरी कृषी विद्यापीठ येथे बी.टेक. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना या परिसरातून पाठीमागील बाजूने येत असे. या परिसरातील धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण मनुष्याला आनंदी ठेवण्यास मदत करते. अशा पवित्र स्थळांमुळे मनाला प्रसन्नता आणि समाधान मिळते, असे त्यांनी नमूद केले.
ह.भ.प. शंतनू महाराज लांबे यांच्या कीर्तनसेवेमुळे कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक रंग चढला. देवस्थानचे अध्यक्ष शंकर कदम यांनी यावेळी देवस्थानच्या कार्याची आणि विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
या प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष शंकर कदम, सचिव गोरक्षनाथ कदम, अॅड. मारुती कदम, जालिंदर कदम, जयराम कदम, तुकाराम कदम, भाऊसाहेब कदम यांच्यासह नाथभक्त आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रम, महाआरती, कीर्तनसेवा, रक्तदान शिबिर आणि महाप्रसादाच्या आयोजनामुळे गोरक्षनाथ गडावर प्रकट दिन भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा झाला.




Total Users : 685923