भेंडा( जनता आवाज वृत्तसेवा):- उसाला पहिली उचल ४ हजार ५०० रुपये प्रतिटन मिळावी आणि रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार रास्त भाव द्यावा, या मागणीसाठी नेवासा तालुका शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेंडा येथील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यातून निघालेला साखरेचा ट्रक अडवून आपला निषेध नोंदविला.
तालुका अध्यक्ष मेजर अशोक काळे आणि युवा अध्यक्ष डॉ. रोहित कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तुवर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांच्या सूचनेनुसार राज्यभर साखर रोखण्याचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रात उसाला पहिली उचल चार हजार रुपयांपर्यंत पोहोचली असताना अहिल्यानगर जिल्ह्यात मात्र ३ हजार १०० रुपयांत शेतकऱ्यांची बोळवण केली जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
“उसाच्या रिकव्हरीचे कारण पुढे करून कारखानदार भाव कमी देत आहेत. मात्र साखर, मळी, बगॅस, इथेनॉल आणि सहवीज निर्मिती अशा उपपदार्थांतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा योग्य वाटा शेतकऱ्यांना मिळत नाही,” अशी भूमिका संघटनेने मांडली.
सी. रंगराजन समितीच्या रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार ७०:३० प्रमाणात उत्पन्नाचे वाटप होणे अपेक्षित आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचा योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
साखरेच्या किमान आधारभूत किमतीत २०१९ नंतर वाढ झालेली नाही. केंद्र सरकारने निश्चित केलेला ३१ रुपयांचा किमान दर वाढवून ६० रुपये करावा. तोपर्यंत कारखान्यांनी साखर विक्री करू नये, अशी मागणीही संघटनेने केली.
दरम्यान, कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने व्हाईस चेअरमन काकासाहेब नरवडे, व्यवस्थापकीय संचालक अनिल शेवाळे आणि संचालक अशोकराव मिसाळ यांनी आंदोलकांशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून केंद्र सरकारकडे साखरेची एमएसपी वाढविण्याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
शेतकरी आक्रमक झाल्यानंतर अडविण्यात आलेला साखरेचा ट्रक माघारी पाठविण्यात आला. यापुढे साखरेचा दर ६० रुपयांपेक्षा कमी असताना विक्री करू नये, अशी भूमिका संघटनेने कारखाना व्यवस्थापनासमोर मांडली.
या आंदोलनात मेजर अशोक काळे, बाबासाहेब नागोडे, ॲड. बाळासाहेब कावळे, दादासाहेब नाबदे, बाबासाहेब खराडे, ताराचंद लोढे, भास्कर तुवर, कृष्णा यादव, बंडोपंत चौगुले, दत्तात्रय निकम, किरण लंघे, संदीप पाखरे, मीराताई गुंजाळ यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते.




Total Users : 685923