लोणी दि.१९( जनता आवाज वृत्तसेवा ):-ग्रामीण भागाच्या विकासाला केंद्र आणि राज्य सरकारचे मोठे पाठबळ मिळत आहे. गावांच्या प्रगती बरोबरच समाजातील शेवटच्या घटकाला योजनांच्या रुपाने मोठा लाभ होत आहे. ग्रामपंचायतीचे सदस्य या नात्याने या योजनेची प्रभावी अंमलबजावणी गावांमध्ये करा, निधीची कमतरता नाही, काम करण्याची फक्त इच्छाशक्ती ठेवा. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच नरेंद्र मोदी २०२४ ला पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील असा विश्वास महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत राहाता, श्रीरामपूर, राहुरी आणि संगमनेर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार सोहळा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. भारतीय जनता पक्षाच्या उत्तर नगर जिल्हा कार्यकारणीतील नवीन पदाधिका-यांनाही या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास चेअरमन कैलास तांबे, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, आण्णासाहेब भोसले, सतिष ससाणे, मच्छिंद्र थेटे, नितीन दिनकर, नितीन कापसे, अशोक पवार, भाजपाचे सचिन शिंदे, श्रीराम गणपुले, दिपक पठारे, बाळासाहेब गाडेकर, योगेश बनकर, भाजपाच्या महिला अध्यक्षा कांचनताई मांढरे, सौ.गिता थेटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणूकीत संपूर्ण राज्यात महायुतीला जनतेने पाठबळ दिले आहे. भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक प्रथम क्रमाकांच्या जागा मिळविल्या आहेत. पक्षाला आणि सरकारला ग्रामीण भागातील दिलेले पाठबळ हे महत्वपूर्ण आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकास प्रक्रीयेवर लोकांनी विश्वास दाखविल्याचा उल्लेख करुन, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या योजनांच्या कामाला मिळालेले हे पाठबळ असल्याचे त्यांनी सांगितले.
विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाची विकास प्रक्रीया वेगाने पुढे जात आहे. जलजीवन मिशन पासून ते देशातील एैशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची योजना प्रभावीपणे सुरु आहे. योजनांच्या रुपाने सरकारची धोरणं लोकांपर्यंत जात आहेत. भविष्यातही या योजनांचा लाभ ग्रामपंचायतींचे सदस्य या नात्यांने तुम्हाला लोकांपर्यंत पाहोचवायच्या आहेत.
शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन सातत्याने सुरु राहणार असून, गावाच्या विकास प्रक्रीयेला निधीची कमतरता भासणार नाही, तुम्ही फक्त काम करण्याची इच्छाशक्ती ठेवा असे आवाहन करुन, मंत्री विखे पाटील म्हणाले की, ज्या विश्वासाने लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे तो कामातून सार्थ करा, गावातील गटतट विसरुन जा. बाहेरील माणसं काय सांगतात याकडे दुर्लक्ष करा. कोणी त्यांच्या बरोबर गेले असतील तर त्यांनाही डिवचू नका असा मोलाचा सल्ला त्यांनी सरपंच आणि ग्रामपचांयत सदस्यांना दिला.
भारतीय जनता पक्षाच्या नवीन पदाधिका-यांनी देखील गावपातळीवर आता योजनांच्या रुपाने मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम करावे, सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संघटनेचे माध्यम तुमच्या हातात असल्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा प्रसार गावागावात करा असे आवाहनही मंत्री विखे पाटील यांनी केले. याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, नितीन दिनकर, कांचनताई मांढरे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमास सर्व तालुक्यातील कार्यकर्ते, विविध संस्थाचे पदाधिकारी, आधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Total Users : 630539