spot_img
spot_img

 कोल्हार खुर्द येथील अपघातात एक ठार; दुसरा गंभीर जखमी

राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):- राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे नगर-मनमाड राज्य महामार्गावर काल, दि. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी व मालट्रक यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

आज दुपारी सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास दिनेश शिवराम चौव्हाण व दिनेश तुळाराम चौव्हाण हे दोघे एम.एच. १७ डी.ए. ४६४८ क्रमांकाच्या दुचाकीवर चिंचोली फाटा येथून कोल्हारकडे जात होते. त्याचवेळी टी. एन. ३० सी. एफ. १३०५ क्रमांकाचा मालट्रक कोल्हारकडून राहुरीच्या दिशेने येत होता. कोल्हार खुर्द येथील साई मंदिराजवळील नगर-मनमाड महामार्गावर ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी व मालट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली.

या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमींना तात्काळ लोणी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिनेश शिवराम चौव्हाण यास उपचारापूर्वीच मृत घोषित केले. दिनेश तुळाराम चौव्हाण याच्यावर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

मृत व जखमी तरुण हे परप्रांतीय असून सध्या चिंचोली फाटा परिसरात राहत होते. ते मूर्ती बनविण्याचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. अपघातानंतर काही काळ नगर-मनमाड महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!