शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा) :- मुंबई–नागपूर समृद्धी महामार्गावर कोपरगाव–सिन्नर दरम्यान, नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या डिझेल टँकरने पाठीमागून मालमोटारीला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात टँकर चालकाचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातामुळे महामार्गावर पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
डिझेल टँकर (एमएच ४९ बीझेड ३१८७) हा मुंबईहून नागपूरच्या दिशेने जात असताना, पुढे चाललेल्या मालमोटारीला (एमएच ०४ एफपी २००८) मागून जोराची धडक दिली. धडकेनंतर टँकरने तात्काळ पेट घेतला. हा अपघात सोमवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास घडला. अपघाताची तीव्रता इतकी होती की मालमोटार महामार्गाच्या खाली जाऊन पडली.
पेट घेतलेल्या टँकरमध्ये अडकलेल्या चालकाचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिर्डी व सिन्नर पथकर नाक्यावरील सुरक्षा पथक, महामार्ग पोलिस, तसेच सिन्नर, समृद्धी महामार्ग व कोपरगाव नगरपालिकेचे अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले आणि त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. समृद्धी महामार्गावर अवजड व हलक्या वाहनांसाठी वेगमर्यादेचे स्पष्ट नियम असतानाही त्याचे पालन होत नसल्याने वारंवार अपघात होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या पुन्हा वाढली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात काही दिवसांपूर्वीच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रेलरला भरधाव स्विफ्ट कार धडकल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर याच परिसरात झालेल्या दुसऱ्या अपघातात कल्याण येथील दोन तरुणांचा मृत्यू झाला होता.
समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा वेळ निश्चितच वाचत आहे. मात्र वेळेच्या बचतीसाठी अतिवेगाने वाहन चालवणे जीवावर बेतत असल्याचे पुन्हा एकदा या अपघातातून स्पष्ट झाले आहे. पूर्वी महामार्गावर वाहनांची तपासणी करणारे आरटीओचे पथक सक्रिय दिसत होते. मात्र सध्या ही तपासणी होत नसल्याने अनेक वाहनांचे टायर खराब, हवेचा दाब कमी असूनही ती महामार्गावर धावत आहेत.
वेगमर्यादा, वाहनांची तांत्रिक तपासणी आणि सुरक्षा नियमांची सातत्याने पायमल्ली होत असल्याने समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कडक अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.



