spot_img
spot_img

भंडारदरा शताब्दी महोत्सव पर्यटकांसाठी आकर्षण ठरावा – जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील विधान भवनातील बैठकीत कृती आराखड्याचा आढावा

शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष सांस्कृतिक व निसर्ग पर्यटनातून साजरे करण्याच्या दृष्टीने सर्वंकष कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. विधान भवनात या आराखड्याचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेटे व स्वप्नील काळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष ऐतिहासिक असून, या निमित्ताने राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे. जलाशय परिसराचे सुशोभीकरण, सांस्कृतिक व पर्यटन विकासातून हे वर्ष साजरे करण्यासाठी जलसंपदा विभागाने विशेष आराखडा तयार केला आहे. हा आराखडा अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांसमोर सादर करून त्यास मान्यता घेतली जाणार असल्याचे मंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

या धरणामुळे जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक क्षेत्रात मोठे परिवर्तन झाले असून, हे बदल नव्या पिढीसमोर सादरीकरणाच्या माध्यमातून मांडण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शताब्दी महोत्सवाचा स्वतंत्र लोगो तयार करावा व प्रत्येक महिन्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करून वर्षभर हा उत्सव साजरा करावा. यात स्थानिक कलाकारांना संधी देऊन त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न व्हावेत. तसेच, पर्यटकांना आकर्षित करणारे पाण्यावर आधारित उपक्रम राबवावेत, असेही त्यांनी सुचवले.

या महोत्सवाची व्याप्ती धरणापासून ते अंतिम चारीपर्यंत असावी. याशिवाय, स्वतंत्र वेबसाईट तयार करून समाजमाध्यमांद्वारे या शताब्दी वर्षाची व्यापक प्रसिद्धी व प्रसार करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!