संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, शाळेत सहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला करण्यात आला आहे. या भ्याड हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने शाळेत धाव घेतली आहे.
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या इयत्ता सहावीतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अज्ञात तरुणाने ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही मुलगी शाळेतून घराच्या दिशेने जात असताना अचानक समोर आलेल्या एका युवकाने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. मुलीने आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूचे नागरिक तातडीने मदतीला धावून आले, परंतु तोपर्यंत आरोपीने तिथून पळ काढला होता. पीडित मुलीला तात्काळ उपचारासाठी लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन सतर्क झाले असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. ॲसिड फेकणाऱ्या अज्ञात नराधमाचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. मुलीला पुढील उपचारासाठी प्रवरा हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वीच संगमनेरमधील रणखांब गावात लग्नास नकार दिल्याने एका तरुणीवर प्राणघातक हल्ला झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता थेट शाळकरी मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्यामुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेरमध्ये कायद्याचा धाक राहिला नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.



