spot_img
spot_img

शिवनिका ट्रस्ट’चे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू; पत्नीही ठार, मुलगा गंभीर

शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):-भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष  जितेंद्र शेळके यांचा आज अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कारने समृद्धी महामार्गावर उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यात जितेंद्र शेळके यांच्यासह त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. जितेंद्र शेळके यांची भोंदू अशोक खरात प्रकरणात चौकशी सुरू होती. एसआयटीने त्यांचा जबाबही नोंदवला होता. ते या प्रकरणातील एक महत्त्वाचे साक्षीदार होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू अपघात की घातपात? याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

जितेंद्र शेळके आज दुपारी १ च्या सुमारास आपल्या कुटुंबासह छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात होते. रस्त्यात समृद्धी महामार्गावरील धोत्रे गावालगत त्यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यात जितेंद्र शेळके व त्यांची पत्नी अनुराधा हे दोघे जागीच ठार झाले. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही धडक एवढी भीषण होती की, त्यांची कार थेट कंटेनरखाली घुसली. त्यामुळे तिचा अक्षरशः चुराडा झाला. जखमी मुलाला लगतच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

जितेंद्र शेळके यांची कार कंटेनरला धडकल्यानंतर बराच वेळ त्याच स्थितीत उभी होती. नंतर कुणीतरी ही माहिती पोलिस प्रशासनाला कळवली. त्यानंतर पोलिस व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जितेंद्र शेळके, त्यांची पत्नी अनुराधा व मुलाला कारमधून बाहेर काढले. पण तोपर्यंत जितेंद्र शेळक व त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. हे तिघेही कारमध्ये बराच वेळ अडकले होते.

मृत जितेंद्र शेळके भोंदू अशोक खरातचा अत्यंत जवळचा सहकारी होते. ते खरातच्या शिवनिका ट्रस्टवर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्यांचा जबाबही नोंदवला होता. त्यांची जवळपास ४ वेळा चौकशी झाली होती. त्यामुळे ते या प्रकरणातील एक महत्त्वाचे साक्षीदार होते. शेळके यांच्या मालकीच्या लॉन्समध्येही खरात याची भागीदारी होती. त्यामुळे खरातला अटक झाल्यामु्ळे शेळके प्रचंड तणावात होते. त्यातच आज त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे ही घटना केवळ अपघात आहे की, घातपात आहे? याविषयी वेगवेगळ्या शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!