spot_img
spot_img

जावयाच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या… आत्महत्येमुळे करंजीत गावात हळहळ ! 

करंजी(जनता आवाज वृत्तसेवा):- पाथर्डी तालुक्यातील करंजी गावच्या जावयाने सासर्‍याकडे पैशाची मागणी करत मानसिक दृष्ट्या खूप त्रास दिला तसेच मेहुण्याला देखील मारून टाकण्याची धमकी दिल्याने जावयाच्या या त्रासाला कंटाळून अखेर सासऱ्याने आत्महत्या करत आपले जीवन संपून टाकल्याची घटना करंजी गावात घडली असून आता या जावयाच्या विरोधात सासूबाईंनी थेट पाथर्डी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी शिवारात शुक्रवारी (दि.१७) रोजी रात्री सासऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी जावई व त्याच्या आई विरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांचा शोध सुरू आहे.

मृत व्यक्तीचे नाव ज्ञानेश्वर तुळशीराम गायकवाड असे असून त्यांच्या पत्नी जिजाबाई गायकवाड यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जावई सुमीत सुनिल चव्हाण त्याची आई संगिता सुनिल चव्हाण (रा. भिंगार, ता. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांची मुलगी ही सुमीत चव्हाण याची पत्नी आहे. सुमीत चव्हाण व त्याची आई संगिता चव्हाण हे वारंवार करंजी येथे येऊन गायकवाड कुटुंबीयांवर दबाव टाकत पैशाची मागणी करत होते. “मुलगी नांदायला पाठवा व दोन लाख रुपये द्या, अन्यथा तुमचा व तुमच्या मुलाचा काटा काढू,तुमची बदनामी करू,” अशा प्रकारच्या धमक्या ते देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याशिवाय जावई सुमित चव्हाण याच्याकडून फोनवरून शिवीगाळ, दमदाटी व बदनामीची धमकी देणे हे प्रकार सातत्याने सुरू होते. या मानसिक त्रासाला कंटाळून ज्ञानेश्वर गायकवाड यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.घटनेच्या दिवशी (दि.१७) रात्री सव्वा नऊ वाजता गायकवाड यांनी एका नातेवाईकाला फोन करून, “मी जावयाच्या धमक्यांना कंटाळलो आहे. हा माझा शेवटचा फोन आहे,” असे सांगत रडू लागले व फोन कट केला. यानंतर संबंधित नातेवाईकाने तातडीने गायकवाड यांच्या भावाला माहिती दिली.

गायकवाड यांचा शोध घेत असताना रात्री सुमारे १०.३० वाजता त्यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत त्यांनी आत्महत्येस जावई सुमीत चव्हाण जबाबदार असल्याचे स्पष्ट लिहून ठेवले होते. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे.या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुमीत चव्हाण व संगिता चव्हाण यांचा शोध सुरू केला आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!