लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-राहाता तालुक्यातील प्रवरा परिसरासह लोणी खुर्द येथील कन्या शाळेच्या मागील तुपे वस्ती परिसरात अज्ञात चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
विशेष म्हणजे, चोरटे परिसरात फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असले तरी अद्याप कोणतीही मोठी चोरी झालेली नाही. मात्र या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, रात्री उशिरा काही संशयित व्यक्ती वस्ती परिसरात फिरताना दिसत आहेत. काही घरांच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये या हालचाली स्पष्टपणे दिसून येत आहेत. चोरटे घरांची पाहणी करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सुदैवाने आतापर्यंत कोणतीही चोरीची घटना घडलेली नसली तरी या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी बाहेर पडण्यास लोक टाळाटाळ करत आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिस प्रशासनाला कळविले असून परिसरात गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी स्वतःही सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
प्रवरा परिसरासह लोणी खुर्द तसेच आसपास परिसरातील काही ठिकाणी चोरट्यांचा मुक्तसंचार वाढ आहे. गेल्या एक-दोन दिवसांपूर्वी सोनगाव , सात्रळ, हनुमंतगाव या परिसरात रात्रीच्या वेळी सात ते आठ जण रेकी करताना दिसून आले होते.



