spot_img
spot_img

आ. विवेक कोल्हे यांच्या स्वागताला उसळला जनसागर, ऐतिहासिक मिरवणूक आमदारकीचा सातबारा जरी माझा असेल पण पोट हिश्यात कार्यकर्त्यांची नावे- आ. विवेक कोल्हे

कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे आशीर्वाद आणि तळागाळातील सर्व मतदार बंधू भगिनी कार्यकर्ते यांची अलौकिक साथ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा विश्वास असे म्हणत युवा नेते विवेक कोल्हे यांनी “धन्यवाद देवा भाऊ धन्यवाद” या घोषणेने कोपरगावचा आसमंत दुमदुमून टाकला.सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली विजयी मिरवणूक अकरा वाजता आटोपली.

ही एक नवी सुरुवात आहे, पक्ष संघटन वाढवून आपल्याला विकासाचे काम करायचे आहे अशा शब्दात युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिला.केवळ तालुक्यापुरते मर्यादित म्हणून ही जबाबदारी पक्षाने दिली नसून मोठे काम संघटनात्मक दृष्टीने देखील युवा शक्तीच्या साथीने करायचे आहे.

अत्याधुनिक जीप, उंट, घोडे आणि डोक्यावर घेऊन नाचणारे हजारो युवक कार्यकर्ते, फुले, हार, गुच्छ, सुहासिनींचे ठिकठिकाणी औक्षण, पेढ्यांची रेलचेल, मोठमोठे बॅनर, आकाशात फटाक्यांची बहारदार उडवणूक, डीजेचा दणदणाट, भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यांची भव्य मोटरसायकल व कार रॅली, संबळ, बँड तडमताशाचा लयबद्ध आवाज, सेल्फी आणि रिल्सचा पाऊस, साथीला देवांचा,श्री साईबाबा तपुभूमी मंदिर येथे आशीर्वाद आणि शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याप्रति विनम्रतेचा आदर असे वर्णन असलेली युवा नेते विवेक कोल्हे यांची विजयी मिरवणूक सर्वांच्याच मनात भरली.

विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव थेट मुंबईतून समृद्धी मार्गे स्वागतासाठी आलेल्या युवाशक्तीच्या शेकडो वाहनांच्या ताफ्यात साईबाबा कॉर्नर कोपरगाव येथे विवेक कोल्हे शनिवारी सायंकाळी दाखल झाले त्याप्रसंगी विजयी मिरवणुकीचा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे समारोप करताना ते बोलत होते. शहरात त्यांच्या स्वागतासाठी “आता थांबायचं नाही”असा आशय असलेले फलक ठिकठिकाणी लावण्यात आले होते.

विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली येथून पुढचा राजकीय प्रवास सुरू झाला आहे त्यात सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. अतिशय कमी वयात सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना या मातृसंस्थेच्या अध्यक्षपदापासून आपली कारकीर्द सुरू झाली आहे. कोपरगावच्या राजकीय प्रवाहात अनेक चढउतार आले, २०२४ च्या निवडणुकीत संयम दाखवला त्याचे हे फळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्व मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी दिले, त्यांनी टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करू. या राजकीय प्रवासात आपल्याला कुठेही ऊतमात करायचा नाही असेही ते म्हणाले व कार्यकर्त्यांना कुठेही आता अन्याय सहन करावा लागणार नाही तुमच्या कामांसाठी मी स्वतः दंड थोपटून उभा आहे काळजी करू नका.आमदारकीचा सातबारा जरी माझ्या नावाने असेल तरी पोट हिश्यात तुमची सर्वांची नावे आहेत त्यामुळे माझ्यासह तुम्ही देखील आमदारच आहात अशा भावनेने जनसेवेसाठी जोमाने कार्यरत राहू.

मिरवणूक प्रारंभी कोल्हे कारखाना कार्यस्थळावर असणाऱ्या श्री हनुमान मंदिर आणि श्री महादेव मंदिर येथे दर्शन घेण्यात आले यावेळी बिपीनदादा कोल्हे,सौ.रेणुकाताई कोल्हे,सर्व संचालक,कारखाना अधिकारी,पदाधिकारी उपस्थित होते.

प्रसंगी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे,ईशान कोल्हे,नगराध्यक्ष पराग संधान यांनी शहरवासीयांच्या वतीने विवेकभैय्या कोल्हे यांचा भव्य मोठा फुलांचा हार घालून नव्या राजकीय कारकिर्दीचा शुभारंभ केला.भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी,विविध संस्थांचे पदाधिकारी,संचालक,नगरसेवक,कार्यकर्ते,नागरिक,महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!