spot_img
spot_img

जिल्हा सहकारी बँकेवर अखेर प्रशासक , ‘संचालक मंडळाचा कालावधी संपला, निवडणुका रखडल्या

अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा): – जिल्हा सहकारी बँकेच्या कारभारावर अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून, संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतरही निवडणुका न झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बँकेचा कारभार आता प्रशासकीय पातळीवरून चालवला जाणार आहे.

बँकेच्या प्रशासकपदी गौतम विठ्ठल निकाळजे (लेखा परीक्षक, वर्ग-१, सहकारी संस्था, अहिल्यानगर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज अधिकृतरित्या पदभार स्वीकारताच कामकाजाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची भेट घेऊन पुढील कारभाराबाबत चर्चा केली. यावेळी शिंदे यांनी त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाची मुदत नुकतीच संपुष्टात आली आहे. यापूर्वी दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनानंतर अध्यक्षपदी घुले यांची निवड करण्यात आली होती. तसेच कर्डीले यांच्या रिक्त जागेवर संचालक म्हणून आमदार अक्षय कर्डीले यांची निवड झाली होती. मात्र, आता संपूर्ण संचालक मंडळाची मुदत संपल्याने प्रशासनाकडे तात्पुरता कारभार सोपवण्यात आला आहे.

सरकारकडून बँकेच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्याने ही प्रशासक नियुक्ती अपरिहार्य ठरल्याचे बोलले जात आहे. नवीन संचालक मंडळ निवडून येईपर्यंत प्रशासकांकडेच बँकेचा कारभार राहणार आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या सत्तासमीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!