अहिल्यानगर ( जनता आवाज वृत्तसेवा): – लोणी परिसरात उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणात आता श्रीरामपूरातील एका डॉक्टरला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आधीच्या छाप्यानंतर तपासाची व्याप्ती वाढवत पोलिसांनी आणखी दोन एजंटांनाही ताब्यात घेतले असून, या रॅकेटमागे मोठे जाळे कार्यरत असल्याचा संशय बळावला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात निळवंडे कालव्याजवळ एका खोलीत महिलांकडून पैसे घेऊन बेकायदा गर्भलिंग तपासणी केली जात होती. त्यावर अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, लोणी पोलीस स्टेशन आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने सापळा रचून छापा टाकत मोठी कारवाई केली.
या छाप्यात यूएसजी मशीन, रोख रक्कम, मोबाईल आणि वाहनांसह सुमारे २४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. पुढील तपासात दोन एजंट — प्रदीप ढगे आणि निलेश भवर — हे गर्भवती महिला व डॉक्टर यांच्यातील दुवा म्हणून काम करत असल्याचे निष्पन्न झाले. दोघांनाही अटक करण्यात आली.
अटकेतील आरोपींच्या चौकशीतून श्रीरामपूर येथील डॉ. रविंद्र कुटे यांचा या रॅकेटमध्ये सहभाग उघड झाला. त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
या प्रकरणात आणखी काही डॉक्टर व एजंटांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होत असून, लोणी पोलीस स्टेशनकडून पुढील तपास सुरू आहे. संयुक्त कारवाईमुळे जिल्ह्यातील बेकायदा गर्भलिंग तपासणीच्या प्रकारांवर मोठा आळा बसण्याची शक्यता आहे.



