spot_img
spot_img

मंकी मास्क घालून बिअर बार फोडून चोऱ्या करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

घारगाव( जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर तालुक्यातील पठार भागातील नांदूर खंदरमाळ गावानंतर्गत पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गा लगतचे किशोर बाळाजी डोके यांचे हॉटेल निलायम बार कोणीतरी अज्ञात चोरट्याने शटरचे कुलूप तोडून हॉटेलमधील विविध कंपन्यांची विदेशी दारू ,सिगारेट, सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीवीआर चोरून नेल्याची घटना रविवार दि.३ मे रोजी घडली होती.या घटनेत तब्बल तीन लाख सहा हजार एकशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला होता.किशोर डोके यांचे फिर्यादीनुसार घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत असताना पो.नि.किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वात स्थानिक पो.उप.नि महादेव गुट्टे,पो.अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, फुरकान शेख, बाळासाहेब गुंजाळ,योगेश कर्डिले,अमृत आढाव, महिला पो.अंमलदार सोनल भागवत, चालक महादेव भांड यांचे पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

सदर गुन्ह्यातील आरोपींचा मागोवा घेत असताना व्यावसायिक कौशल्य,तांत्रिक विश्लेषण नुसार माहिती घेतली असता सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार हसन हमजा कुट्टी रा.नाशिक याने त्याचे साथीदारासह केला असुन तो त्याचे साथीदारासह नाशिक येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे हसन हमजा कुट्टी रा.नवनाथनगर, शेवाडी, पंचवटी नाशिक, आकाश सचिन सुर्यवंशी रा. दत्त चौक, कालीका माता मंदिराजवळ सिडको, नाशिक, मेहताब गुलाम रसुल अन्सारी मुळ रा.नुरीनगर, कटहार तांडा,ता. निंम्मेगड, जि.गिरटी झारखंड असे तिघेजण मिळून आले.त्यांना विश्वासात घेवुन सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी त्याचे अजून एक साथीदार बंटी दास पुर्ण नांव माहित नाही रा. झारखंड हा फरार असून याचेसह सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

आरोपींकडे गुन्ह्यातील मुद्देमाला बाबत विचारपुस केली असता त्यांनी गुन्ह्यातील मुद्देमाल पळसे ता.जि.नाशिक येथील हॉटेल लकी बार ऍ़ण्ड रेस्टॉरंटचे चालक किरण रामदास उगले व विवेक अरुण उगले यांना चोरीचा माल असल्याचे सांगुन विक्री केला.तर विवेक अरुण याने चोरी करण्यासाठी वाहन उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी सांगितले. किरण उगले व विवेक उगले यांचा शोध घेता किरण रामदास उगले रा.सामनेर ता. इगतपुरी जि.नाशिक हल्ली रा. लकी बार अँड रेस्टॉरंट पळसे नाशिक हा मिळुन आलेला आहे.

आरोपी किरण उगले याचे ताब्यातून ४ लाख ५ हजार १६० रु कि.ची वेगवेगळ्या कंपन्याची विदेशी दारु ,१ लाख ५० हजार -रु की.ची एक टाटा इंडिका कार क्र एम.एच.४८.एफ.०७२३ व कटर, मंकी मास्क,एअर पिस्टल स्क्रु डायव्हर,असा एकुण ५ लाख ५५ हजार १६० रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींनी अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का.? याबाबत सखोल तपास केला असता त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात दोन गुन्हे तर ,वावी,जि.नाशिक व पिंपळगाव बसवंत जि.नाशिक येथे देखील अशा प्रकारचे आणखी चार गुन्हे केले असल्याचे समोर आले आहे.सदर आरोपींना तपास कामी घारगाव पोलीस स्टेशन येथे हजर करुन अटक करण्यात आले असुन पुढील तपास घारगाव पोलीस ठाणे करत आहे…

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!