टाकळीभान(जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे बस स्टँड परिसरातील अश्वारूढ पुतळा काढण्यासाठी प्रशासनातून हालचाली झाल्याने गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता अखेर प्रशासन व ग्रामस्थांची बैठक होऊन त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा काढण्याची मुदत एक महिन्याची देण्यात आली असून एक महिन्याच्या आत कायदेशीर कागदपत्राची रीतसर परवानगी घेऊनच चांगल्या प्रतीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात यावा व तोपर्यंत पुतळा झाकून ठेवण्यात यावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून ग्रामस्थांना करण्यात आले.
टाकळीभान येथे छत्रपती शिवरायांचा मोठा अश्वारूढ पुतळा व्हावा अशी ग्रामस्थांची बऱ्याच वर्षापासून इच्छा होती. ६ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा विना परवानगी स्टँड परिसरामध्ये ग्रामस्थांच्या वतीने बसवण्यात आला. शासनास सदर माहिती मिळताच पुतळा काढण्यासंदर्भात ग्रामस्थांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून कालपासूनच रात्री बारा वाजेपासून पोलीस फौज फाटा टाकळीभान येथे दाखल होऊन छावणीचे स्वरूप प्राप्त होऊन पुतळ्या काढण्यासंदर्भात हालचाली सुरू होत्या. त्या पार्श्वभूमीवर अचानकपणे ग्रामस्थांनी सकाळी गाव बंदचे अवाहन केले होते. व त्याप्रमाणे व्यापारी व ग्रामस्थांनी स्वतःहून स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवले होते.
परंतु काल सकाळी पोलीस स्टेशन समोर वरिष्ठ पोलीस अधिकारी,प्रशासन, महसूल व बांधकाम अधिकारी व ग्रामस्थांची बैठक झाली. यातून सर्व प्रशासनाचे अधिकारी व ग्रामस्थां मध्ये या संदर्भात चर्चा होऊन, यावेळी श्रीरामपूर तालुका पोलीस उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर व पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे येथील ग्रामस्थांच्या भावना कळविल्या व वरिष्ठांनी पुतळ्यास लागणाऱ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली. परंतु तोपर्यंत पुतळा झाकून ठेवण्याचे आदेश पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. यावेळी ग्रामस्थांकडून आरती करून पुतळा झाकण्यात आला. पोलीस प्रशासनाच्या प्रशासनाकडून आश्वासनामुळे गाव पूर्ववत सुरू झाले.व एक महिन्याची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी मुदत वाढ मिळाली म्हणून शिवप्रेमींना तूर्तास दिलासा मिळाला असून व पोलीस प्रशासनाचे ग्रामस्थांकडून आभार व कौतुक करण्यात आले.



