अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):- पोलिस मुख्यालयात सुरू असलेल्या प्रशिक्षणादरम्यान सोमवारी सकाळी घडलेल्या हँडग्रेनेड स्फोटामुळे मोठी खळबळ उडाली. स्मोक हँडग्रेनेड हाताळणीचे प्रात्यक्षिक सुरू असताना अचानक झालेल्या स्फोटात चार प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी जखमी झाले. यातील दोघांच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर नियमित प्रशिक्षण सुरू होते. जमाव नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या स्मोक हँडग्रेनेडची हाताळणी कशी करायची, याबाबत प्रशिक्षणार्थी जवानांना मार्गदर्शन केले जात होते. प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सुरू असतानाच संबंधित ग्रेनेडचा अचानक हातातच स्फोट झाला. स्फोटाचा आवाज मोठा असल्याने काही काळ मुख्यालय परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या दुर्घटनेत शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मढे आणि योगेश सोळंके हे चार प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांच्या हाताच्या बोटांच्या चिंधड्या उडाल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित दोघांना किरकोळ दुखापत झाली असली तरी स्फोटाच्या तीव्रतेमुळे सर्वांनाच मानसिक धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.
घटनेनंतर जखमी जवानांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून काही जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून प्रशिक्षण प्रक्रियेतील सुरक्षाव्यवस्थेचाही आढावा घेतला जात आहे. या घटनेनंतर पोलिस दलात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशिक्षणादरम्यान वापरण्यात येणाऱ्या स्फोटक सामग्रीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
राखीव पोलिस निरीक्षक उमेश परदेशी यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित जवानाने ग्रेनेडची पीन काढल्यानंतर त्यावरील लिव्हर हातातून सुटल्याने हा अपघाती स्फोट झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशिक्षण प्रक्रियेत अधिक कडक सुरक्षा उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



