श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- शहरात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी सकाळी मोठी आणि समन्वित कारवाई करत सात ते आठ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानस्थित गुन्हेगारी टोळ्यांशी संपर्क असल्याच्या संशयावरून चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानातील कथित गँगस्टर शैजाद भट्टी आणि राणा गटाशी संबंधित काही व्यक्तींशी श्रीरामपूरमधील काही तरुणांचा संपर्क असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. या माहितीच्या आधारेच शहरातील विविध भागांमध्ये ही छापेमारी करण्यात आली.
तपास यंत्रणांच्या प्राथमिक संशयानुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संपर्क साधून काही व्यक्तींनी स्थानिक स्तरावरील काही महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती गोळा करण्याचा तसेच त्यांच्या हालचालींबाबत माहिती संकलित करण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच काही ठिकाणी रेकी झाल्याचा संशयही तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, हिंदुत्ववादी कार्यकर्ते सागर बेग यांच्या निवासस्थानाची रेकी करून संबंधित माहिती परदेशातील नेटवर्कपर्यंत पोहोचविण्यात आल्याचा संशयही तपास यंत्रणांकडून तपासला जात आहे. मात्र या सर्व बाबींची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेले मोबाईल फोन, डिजिटल उपकरणे तसेच सोशल मीडिया व्यवहारांची सखोल तपासणी सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या चौघांकडून एटीएसकडून कसून चौकशी केली जात असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे.
या कारवाईमुळे श्रीरामपूर परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Total Users : 660025