कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- विश्वगौरव विभूषित महायोगी प.पू. स्वामी श्री गगनगिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह सोहळा २०२६ निमित्त आयोजित ‘कृषी महोत्सवाचे उद्घाटन जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दिनांक ९ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता श्रीक्षेत्र राजापूर रोड, गुंजाळवाडी (ता. संगमनेर) येथे आयोजित करण्यात आला आहे.
अखंड हरिनाम सप्ताह नियोजन समितीच्या विशेष निमंत्रणाचा स्वीकार करून जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर जगद्गुरूंचे अमृतमय प्रवचन होणार असून, त्याचा लाभ समस्त भाविक भक्तगणांना मिळणार आहे.
दक्षिण पिठाचे पीठाधीश्वर जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे अध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक उपक्रम अविरत सुरू आहेत. जसे की –
देहदान : आजपर्यंत २०८ व्यक्तींनी देहदान केले आहे.
अवयव दान : १७२ लोकांनी अवयव दान केले आहे.
आरोग्य सेवा : अपघातग्रस्तांसाठी महामार्गावर ५३ रुग्णवाहिका ( ॲम्बुलन्स ) विनामूल्य सेवा देत आहेत.
शिक्षण : सीबीएससी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण विनामूल्य दिले जाते.
रक्तदानः ‘जीवनदान महाकुंभ’ अंतर्गत २०२५ मध्ये १,३७,२७० आणि २०२६ मध्ये १,७१,१५० रक्तकुपिका महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढीला देण्यात आल्या आहेत.
जलसेवा : १०,३५३ जलसाठे करण्यात आले असून, ४,५९८ कच्चे बंधारे बांधून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ संकल्प राबवण्यात आला आहे.
वसुंधरा संवर्धन : ‘एक पेड मां के नाम’ उपक्रम अंतर्गत २०२५ मध्ये १,११,४४० झाडे लावण्यात आली असून, त्यांच्या संगोपनाचे कार्य सुरू आहे. अशी अनेक सेवाकार्ये आज समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
अध्यात्म, विज्ञान आणि व्यवहार’ या त्रिसूत्रीची सांगड घालून सुखी जीवन कसे जगावे, यावर जगद्गुरू मार्गदर्शन करणार आहेत. भक्ती हा मनाचा व्यायाम असून तो केल्याने निर्णयक्षमता, साधक-बाधक विचार करण्याची क्षमता, प्रगल्भता आणि दूरदृष्टी कशी विकसित होते, तसेच मानवता धर्म कसा पाळावा आणि ‘भक्ती हीच सेवा’ या विषयांवर ते भाविकांना मार्गदर्शन करणार आहेत.
तरी, समस्त शेतकरी व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अमृतमय प्रवचनाचा लाभ घ्यावा असे नम्र आवाहन अहिल्यानगर उत्तर सेवाकेंद्र समिती व कोल्हार भगवतीपुर सेवा केंद्राच्या वतीने करण्यात येत आहे.



