श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा) :- करणी आणि जादूटोणा केल्याच्या संशयातून सख्ख्या बहिणीचा कोयत्याने निर्घृण खून करणाऱ्या आरोपीस श्रीरामपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष व सत्र न्यायाधीश (क्रमांक १) एस. एन. साळवे यांनी हा निकाल दिला. न्यायालयाने आरोपी हुसैन अब्दुल्ला पठाण याला जन्मठेपेसह १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात २४ ऑक्टोबर २०१९ रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, जखमी मरीयम दादामियाँ पठाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर कलम ३०२ (खून) वाढविण्यात आले.
सरकारी पक्षाच्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी मरीयम पठाण या त्यांच्या घरी सून शाहीन पठाण यांच्यासोबत असताना त्यांचा भाऊ हुसैन पठाण तेथे आला. “तू करणी आणि जादूटोणा करून कुटुंबातील सदस्यांना मारले,” असा आरोप करत त्याने सोबत आणलेल्या कोयत्याने मरीयम यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर सपासप वार केले.
आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले आणि आरोपीला पकडून ठेवले. गंभीर जखमी झालेल्या मरीयम यांना प्रथम श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात, त्यानंतर लोणी येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक डी. डी. उजे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षाने नऊ साक्षीदार तपासले. सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षी यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले.
न्यायालयाने निकालात नमूद केले की, आरोपीचा बचाव ग्राह्य धरता येत नसून, उपलब्ध पुराव्यांवरून गुन्हा सिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे, आरोपीने यापूर्वी स्वतःच्या पत्नीचाही खून केला होता. त्या प्रकरणात शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने बहिणीवर करणी-जादूटोण्याचा संशय घेत तिची हत्या केल्याचे तपासात समोर आले.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. पी. पी. गटणे, ॲड. एम. आर. नवले आणि ॲड. एन. आर. कहाणे यांनी काम पाहिले. पोलिस उपनिरीक्षक विलास घाणे आणि पोहेकॉ सय्यद यांनी न्यायालयीन कामकाजात सहाय्य केले.



