पाथर्डी(जनता आवाज वृत्तसेवा) :-तालुक्यातील निवडुंगे येथील भिशी चालक असलेल्या तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पाथर्डी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. भिशीचे लाखो रुपये थकवून तसेच इतर सदस्यांनाही पैसे भरण्यास मज्जाव केल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
याबाबत महेश कुंडलिक ढवळे (रा. निवडुंगे, ता. पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आबिद आसिफ शेख, नयुम बब्बुभाई शेख आणि कालू बब्बुभाई शेख (सर्व रा. निवडुंगे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत बाळासाहेब कुंडलिक ढवळे (वय ३५) यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी भिशी सुरू केली होती. भिशीतील काही सदस्यांनी भिशी उचलल्यानंतर पुढील हप्ते भरणे बंद केले. तसेच इतर सदस्यांनाही पैसे भरू नका, असे सांगत असल्याने बाळासाहेब ढवळे आर्थिक अडचणीत सापडले होते. यामुळे ते गेल्या तीन-चार महिन्यांपासून मानसिक तणावाखाली वावरत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. नयुम शेख याने हॉटेल व्यवसायासाठी बाळासाहेब ढवळे यांच्याकडून घेतलेले सुमारे सात लाख रुपये परत देण्यास नकार दिला होता.
तसेच भिशीच्या रकमेबाबत विचारणा केल्यावर संबंधितांकडून दमदाटी करण्यात येत होती. त्यामुळे ढवळे यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले होते.दरम्यान, १६ जून रोजी सायंकाळी बाळासाहेब ढवळे हे घरातून कोणालाही न सांगता चारचाकी वाहन घेऊन निघून गेले. रात्री त्यांचा मोबाईल बंद लागत असल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता तिसगाव-पाथर्डी रस्त्यालगत २९ मैल परिसरात त्यांची कार उभी आढळली. जवळच बाळासाहेब ढवळे बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसून आले. त्यांच्या शेजारी विषारी औषधाच्या बाटल्या आढळल्याने त्यांना तत्काळ उपचारासाठी शेवगाव येथील नित्यसेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी संबंधित तिघांमुळे आपण कर्जबाजारी झालो असून त्यांनी पैसे न भरल्याने व उसनवारीची रक्कम परत न दिल्याने जगण्याचा मार्गच बंद झाल्याचे आपल्या भावाला सांगितले. पुढील उपचारासाठी नगर येथे नेत असताना तिसगाव परिसरात त्यांची प्रकृती खालावली. त्यांना निरामय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मृत्यूपूर्वी भावासमोर व्यक्त केली खंत
उपचारादरम्यान शुद्धीवर आल्यानंतर बाळासाहेब ढवळे यांनी, भिशीचे पैसे थकविणारे आणि उसनवारीची रक्कम न परत करणाऱ्यांमुळे मी कर्जबाजारी झालो आहे. त्यांनी मला मरणाशिवाय दुसरा पर्याय ठेवलेला नाही अशी व्यथा आपल्या भावाकडे व्यक्त केल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. या कथित वक्तव्यामुळे प्रकरणाला गंभीर वळण मिळाले असून पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



