संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- शेत जमिनीच्या सपाटीकरणाच्या कामासाठी मंडळ अधिकाऱ्यांच्या नावाने पाच हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी रंगेहात पकडले. नितीन किसन खर्डे (वय २९, रा. चंदनापुरी झोळे, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जेसीबीच्या सहाय्याने शेतजमिनी सपाटीकरणाचे काम करतात. ८ जून रोजी आरोपी नितीन खर्डे याने तक्रारदाराला तलाठी कार्यालयात बोलावून घेतले होते. तेथे मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी संबंधित कामाबाबत चर्चा झाली. त्यानंतर कार्यालयाबाहेर तक्रारदारास अडवून खर्डे याने मंडळ अधिकाऱ्यांसाठी पाच हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा अवैध गौण खनिज उत्खननाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी धमकी देत लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिककडे तक्रार दाखल केली. १९ जून रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता आरोपीने पाच हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने सोमवारी सापळा रचला.
पूर्वनियोजित कारवाईदरम्यान आरोपी नितीन खर्डे याने तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस हवालदार संदीप वनवे व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाळदे यांचा समावेश होता.
पोलीस अधीक्षक भारत तांगडे तसेच अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
लाच मागितल्यास तक्रार करा
कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणीही लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.



