देवळाली प्रवरा(जनता आवाज वृत्तसेवा):-देवळाली प्रवरा येथील लाख रोड परिसरात मंगळवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत विजेच्या तारा तुटून खाली कोसळल्याने आठ गायींचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी मच्छिंद्र बापू काळे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास परिसरात रिमझिम पावसासह जोरदार वादळी वारे वाहत होते. अचानक आलेल्या वादळामुळे वीजवाहक तारा तुटून खाली पडल्या. त्यावेळी मच्छिंद्र काळे यांच्या गोठ्याच्या परिसरात विद्युत प्रवाह पसरल्याने गोठ्यातील आठ गायींना जोरदार विद्युत धक्का बसला. काही क्षणांतच सर्व गायी मृत्युमुखी पडल्याने काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष सत्यजीत कदम, शेतकरी सेनेचे रवींद्र मोरे, माजी नगरसेवक डॉ. संदीप मुसमाडे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्य सुरू करण्यात आले असून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, या दुर्घटनेत झालेल्या नुकसानीची शासनाने तातडीने दखल घेऊन काळे कुटुंबाला आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे पावसाळ्यातील वादळी हवामानाच्या पार्श्वभूमीवर वीजवाहिन्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.



