पाथर्डी( जनता आवाज वृत्तसेवा ):-हिंदू धर्मरक्षक तसेच राष्ट्रीय श्रीराम हिंदू संघटनेचे अध्यक्ष सागर बेग व शिवसेना नगरसेवक आकाश बेग यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचा दावा करत त्यांना तात्काळ सशस्त्र पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी पाथर्डी तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन मुकुंद गर्जे, दत्तू गीते, सोमनाथ बंग, दीपक सानप, भारत लिपारे, विनोद खटावकर यांनी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, पुणे येथील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अस्लम उर्फ बंटी जहागीरदार यांच्या हत्या प्रकरणात सागर बेग व त्यांच्या बंधूंचे नाव विनाकारण जोडण्यात आले होते. मात्र, संबंधित प्रकरणाच्या पोलीस तपासात त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
त्यानंतर काही समाजकंटक, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती तसेच अतिरेकी विचारसरणीच्या घटकांकडून सोशल मीडियावर सातत्याने धमकीचे व्हिडिओ व आक्षेपार्ह संदेश प्रसारित केले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच २३ मे २०२६ रोजी सागर बेग यांच्या राहत्या घराची दोन अज्ञात व्यक्तींनी संशयास्पदरीत्या रेकी केल्याचा आणि त्यानंतर परदेशस्थित कथित गुन्हेगारांकडून जीवे मारण्याच्या तसेच घर बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या देण्यात आल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप संबंधित आरोपींवर ठोस कारवाई झालेली नसल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. सागर बेग व आकाश बेग हे सामाजिक, धार्मिक आणि जनहिताच्या कार्यात सक्रिय असल्याने त्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सागर बेग व आकाश बेग यांना तातडीने सशस्त्र पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.



