श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा) : –महिन्याला २० हजार रुपये दिल्याशिवाय चिकन शॉप चालवू देणार नाही, अशी धमकी देत एका चिकन व्यावसायिकावर हॉकी स्टिक, दांडके आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना श्रीरामपूर शहरात घडली. या प्रकरणी पाच जणांसह दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, जखमी व्यावसायिकावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तौसीफ समीर पठाण (वय ३१, रा. गोधवणी वॉर्ड, श्रीरामपूर) यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, फतेह चौक परिसरात त्यांचे ‘आझाद चिकन शॉप’ असून ते भाऊ असीम पठाण यांच्यासह व्यवसाय करतात.
२० जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास अमन आयुब शेख आणि शाहरुख उर्फ गोव्या बागवान हे दुकानात आले. त्यांनी महिन्याला २० हजार रुपये देण्याची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर दोघांनी धमकी देत तेथून निघून गेल्याचे तौसीफ यांनी जबाबात नमूद केले आहे.
यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास दुकान बंद करत असताना अमन आयुब शेख, अमन आसिफ शेख, शाहरुख उर्फ गोव्या बागवान, रेहान राजू शेख, आवेज कुरेशी आणि दोन अनोळखी व्यक्ती तेथे आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमन आयुब शेख याने हॉकी स्टिकने, तर शाहरुख उर्फ गोव्या बागवान याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच, “यापुढे चिकन शॉप सुरू केले तर जीवे मारून टाकू,” अशी धमकी देऊन आरोपी तेथून निघून गेल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
जखमी अवस्थेत घरी पोहोचल्यानंतर कुटुंबीयांनी तौसीफ पठाण यांना उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली असून, पोलिसांनी तक्रारीनुसार पुढील तपास सुरू केला आहे.



