spot_img
spot_img

मुख्यमंत्र्यांना पांडुरंग पावला?  शिक्षणमंत्री  राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचालींना वेग फडणवीस तातडीने दिल्लीत; अमित शहांशी आज निर्णायक चर्चा?

मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात पेटलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजधानी दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी तातडीने दिल्लीला रवाना झाले असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेणार आहेत.

या पार्श्वभूमीवर केंद्रातील मंत्रिमंडळात फेरबदल होणार का आणि त्यात फडणवीस यांच्यावर नवी जबाबदारी सोपविली जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना हा “विद्यार्थ्यांचा आणि लोकशाहीचा विजय” असल्याचे म्हटले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे केंद्र सरकारला झुकावे लागले असून, मोदी सरकारच्या कार्यकाळातील जबाबदारी स्वीकारून दिलेला हा पहिला राजीनामा असल्याचा दावा त्यांनी केला.

सरकारने टास्क फोर्स, एसआयटी आणि प्रशासकीय बदल यांसारख्या उपाययोजना आधीच का केल्या नाहीत, असा सवाल उपस्थित करत चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली. विद्यार्थ्यांच्या वाढत्या दबावानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे मात्र राजकीय चर्चांना नवे परिमाण मिळाले आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी त्यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, अशा चर्चा रंगल्या असल्या तरी त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे अमित शहा-फडणवीस भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!