श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या सज्ञान मुलीला अडवण्यासाठी तिच्या आईने थेट चालत्या कारच्या बोनेटवर बसून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काल, सोमवारी सकाळी श्रीरामपूर शहरात घडली. या प्रकारामुळे कर्मवीर चौक ते सय्यदबाबा चौक परिसरात मोठी खळबळ उडाली.
माहितीनुसार, श्रीरामपूर तालुक्यातील एका तरुणीने राहुरी तालुक्यातील एका तरुणासोबत काही दिवसांपूर्वी पळून जाऊन विवाह केला होता. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
ही तक्रार मागे घेण्यासाठी तरुणी व तिचा पती काल, सोमवारी सकाळी श्रीरामपूरला येणार असल्याची माहिती मुलीच्या नातेवाईकांना मिळाली. त्यामुळे ते पोलिस ठाण्याबाहेर थांबले होते. दरम्यान, हे जोडपे स्विफ्ट कारमधून येताच नातेवाईकांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, कार न थांबल्याने संतप्त झालेल्या तरुणीच्या आईने थेट कारच्या बोनेटवर बसून हातातील चप्पल काचांवर व बोनेटवर मारत वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. तरीही कार पुढे जात राहिल्याने हा थरार अनेक नागरिकांनी पाहिला.
काही नागरिक व दुचाकीस्वारांनी कारचा पाठलाग करून सय्यदबाबा चौकाजवळ वाहन थांबवले. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी कारची काच फोडून संताप व्यक्त केला. सुरुवातीला महिलेचे अपहरण झाल्याची अफवा पसरली होती. मात्र, पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सर्व संबंधितांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
या संपूर्ण घटनेमुळे काल, सकाळी श्रीरामपूर शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिस ठाण्यात प्रेमविवाहाची कबुली
पोलिस ठाण्यात चौकशीदरम्यान संबंधित तरुण-तरुणीने परस्पर संमतीने विवाह केल्याचे स्पष्ट झाले. दोघेही कायदेशीरदृष्ट्या सज्ञान असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विशाल खैरे यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांसह तरुण व तरुणी यांचे समुपदेशन करत परस्पर चर्चा घडवून आणली. प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात समेटाचे प्रयत्न सुरू होते.




Total Users : 637675