spot_img
spot_img

बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी बचावला कोल्हार  येथील घटना; पिंजरा लावण्याची मागणी

कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा) :राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम असून, मंगळवारी सकाळी चारा कापण्यासाठी शेतात गेलेल्या तरुण शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात तरुण शेतकरी अमोल दिनकर घोगरे हे बालंबाल बचावले. मात्र, बिबट्याच्या तीक्ष्ण नखांमुळे त्यांच्या कपाळावर आणि पोटावर जखमा झाल्या आहेत. या घटनेमुळे कोल्हार खुर्द परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोल्हार खुर्द येथील घोगरे वस्ती परिसरात काल (दि. ११) सकाळी साडेआठच्या सुमारास अमोल घोगरे हे आपल्या जनावरांसाठी चारा कापण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी गिन्नी गवताच्या गबतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. बिबट्याने हल्ला करताच घोगरे यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. दैव बलवत्तर म्हणून ते बिबट्याच्या तावडीतून बचावले. मात्र हल्ल्यात त्यांच्या कपाळावर आणि पोटावर बिबट्याच्या तीक्ष्ण नखांनी ओरखडे व जखमा झाल्या.

गेल्या काही दिवसांपासून कोल्हार खुर्द शिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. या परिसरात बिबट्याने अनेक वेळा दर्शन दिल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. यापूर्वी कुत्रे, पाळीव शेळ्या तसेच कालवडी बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.

या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाने तातडीने परिसरात पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी पिंजरा लावून त्याला जेरबंद करावे, तसेच परिसरात वनविभागाचे पथक तैनात करून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आता बिबट्या नरभक्षक होण्याची वाट पाहू नका. यापूर्वीच अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले झाले असून आता थेट तरुण शेतकऱ्यावर हल्ला झाला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!