प्रतिनिधी -किरण शिंदे
वाकडी (जनता आवाज वृत्तसेवा):-वारकऱ्यांचा महाकुंभ असलेल्या सद्गुरू योगीराज श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाला मंगळवार दि. १८ ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र धनगरवाडी येथे भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सुमारे एक लाखच्या आसपास भाविकांच्या उपस्थितीने श्रीक्षेत्र धनगरवाडी गजबजून गेले.सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी महंत रामगिरीजींच्या उपस्थितीत पंचपदी होऊन भजनाची सुरुवात करण्यात आली.पंचपदीनंतर टाळ-मृदंगाच्या गजरात अखंड हरिनामाला प्रारंभ झाला. वारकरी, टाळकरी आणि भजनी मंडळांच्या सहभागाने मुख्य मंडपात हरिनामाचा गजर सुरू झाला.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून वारकरी, भाविक आणि भक्त मोठ्या संख्येने दाखल झाले आहे. सकाळपासूनच सप्ताहस्थळाकडे भाविकांचा ओघ सुरू असल्याने परिसरात टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष घुमत होता. या सप्ताहाचे मार्गदर्शन गोदाधाम सरला बेटाचे मठाधीपती ह.भ.प. महंत रामगिरीजी महाराज करीत आहेत. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येवला भागातून व धनगरवाडी पंचक्रोशीतून पुरण पोळी व मांडे प्रसाद देण्यात आला. बाबासाहेब चिडे मित्र मंडळाच्यावतीने 35 हजार लिटर दूध यावेळी देण्यात आले
महंत रामगिरीजी महाराजांची भव्य मिरवणूक सप्ताहाचे खास आकर्षण
सप्ताहाच्या प्रारंभी फुलांच्या माळांनी आकर्षक सजविलेल्या रथात महंत रामगिरीजी महाराजांना विराजमान करून श्रीरामपूर येथील हरेगाव फाटा येथून सुमारे चार हजार दुचाकी रॅलीत मेनरोड ,छत्रपती शिवाजी महाराज रोड ,दत्तनगर, श्रीरामपूर एम.आय.डी.सी,यशवंतबाबा चौक ते सप्ताहस्थळ या मार्गावर रामगिरीजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.श्रीरामपूर ते श्रीक्षेत्र धनगरवाडी मार्गावर विविध ठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढून तसेच फुलांची उधळण करून महंत रामगिरीजी महाराजांचे स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली. फुलांच्या वर्षावात आणि हरिनामाच्या जयघोषात मिरवणुकीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत झाले.मिरवणुकीत वाकडी येथील श्री लक्ष्मी नारायण विद्यालय मधील विद्यार्थ्यांनी वारकरी वेश परिधान करून हातात टाळ घेऊन पखवादच्या तालावर शतपावली करीत महाराजांच्या रथासमोर टाळ वाजवून भव्य स्वागत केले.
अकोले तालुक्यातील लव्हाळवाडी येथील आदिवासी बांधवांनी आदिवासी वेश धारण करून आकर्षण नृत्य सादर केले तसेच धनगरवाडी शाळेचे झेंडेकरी, चितळी शाळेचे झांज पथक, अश्व नृत्य, आदिवासी नृत्य, खैरी शाळेचा रामायण देखावा, कोल्हार शाळेचे ढोल पथक, वाकडीचा खंडोबा महाराज रथ, बेलापूरचे ढोल पथक, साई तीर्थ शिर्डीचा साईबाबा रथ, चितळी शाळेचे लेझीम पथक, वाकडी शाळेचा संत परंपरा देखावा, धनगरवाडी शाळेचा समाजसुधारक देखावा, वाकडी शाळेचे लेझीम पथक व पांडुरंग देखावा सहभागी झाले.पुरुष झेंडेकरी, कलशधारी महिला, भजनी मंडळ, महाराजांचा मुख्य रथ आणि सुरक्षा रक्षक पथकाने मिरवणुकीची शोभा वाढविली.
श्रीक्षेत्र धनगरवाडी (ता.राहाता) गावाची लोकसंख्या अवघी पंधराशे आहे. या लोकसंख्येच्या मानाने लाखो भाविकांच्या सप्ताहाचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान असतानाही धनगरवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेत सप्ताहाचे नियोजन उत्कृष्टपणे केले आहे. वाहतूक, पार्किंग, महाप्रसाद, स्वच्छता, पाणी, सुरक्षा आणि स्वयंसेवकांची व्यवस्था अशा विविध पातळ्यांवर करण्यात आलेले नियोजन भाविकांच्या सोयीचे ठरत आहे.
चार एकरांवर कृषी प्रदर्शन
सप्ताहानिमित्त सुमारे चार एकर जागेवर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध प्रकारचे ट्रॅक्टर, शेतीअपयुक्त साहित्य, घरगुती व महिला बचतगटासाठी आवश्यक साहित्य, विविध शेती बियाणे, मशिनरी, इलेक्ट्रिक वस्तू वाहने, कार असे विविध उपयुक्त उपकरणे यात असून कृषी क्षेत्रातील विविध उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञान, शेतीविषयक माहिती आणि साहित्याची माहिती या प्रदर्शनातून शेतकरी व भाविकांना मिळणार आहे.
१२ अधिकारी, ३०० पोलीस शिपाई, १०० होमगार्ड, खाजगी सुरक्षा रक्षक असा कडेकोट बंदोबस्त
सप्ताहस्थळी अहिल्यानगर पोलिसांनी तब्बल १२ पोलीस अधिकारी, ३०० पोलीस शिपाई, १०० होमगार्ड आणि महंत रामगिरीजींच्या सुरक्षेसाठी नियमित असलेली सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे तसेच आवश्यक ठिकाणी १० बाऊन्सर यांचा समावेश होता. भाविकांची वाढती गर्दी, मिरवणुकीतील सहभागींची संख्या आणि वाहतूक व्यवस्था लक्षात घेऊन विविध ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनासह स्थानिक स्वयंसेवक आणि ग्रामस्थांनीही विशेष सहकार्य करीत आहे.गर्दीचे नियमन, वाहतूक नियंत्रण तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली.
या सप्ताह मध्ये पालकमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष उभारण्यात आला असून याठिकाणी प्रवरा मेडिकल ट्रस्ट टीम, जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र टीम, साखर कामगार हॉस्पिटल आदी डॉक्टरांची सेवा उपलब्ध आहे. तसेच गंगागिरीजी आरोग्यधाम उपचार केंद्र, रक्तपेढी, टिळकनगर इंडस्ट्रीज तर्फे मोफत आरोग्य तपासणी देखील या ठिकाणी सात दिवस उपलब्ध आहे.
कोपरगाव मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे यांनी सप्ताह परिसरात डीपी, विद्युत पुरवठा साठी पोल, इलेक्ट्रिक साहित्य असे सुमारे तीस लाखाची मदत केली असून या सप्ताहसाठी 51 क्विंटल साखर दिली आहे.




Total Users : 616165