सोनई( जनता आवाज वृत्तसेवा):- नेवासा तालुक्यातील एका पोर्टल आणि त्याच्याशी संबंधित युट्यूब माध्यमाच्या वृत्तांकनावरून गेल्या काही दिवसांपासून वाद निर्माण झाला आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या विविध वृत्तांबाबत तक्रारी दाखल होत असतानाच आता सोनई पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका गुन्ह्यातील पीडित महिलेचे नाव प्रसिद्ध केल्याचा आरोप पुढे आला आहे.
याप्रकरणी नेवासा नगरपंचायतीतील चार नगरसेवकांनी नेवासा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. याच पोर्टलविरोधात यापूर्वीही नेवासा पोलिसांकडे विविध तक्रारी दाखल झाल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. एका गुन्ह्यातील फिर्यादीतील मजकूर वगळून बातमी प्रसिद्ध केल्याबाबतची तक्रार तसेच नगराध्यक्ष आणि नेवासा शहराची बदनामी केल्याचा आरोप करणारी तक्रारही पोलिसांकडे दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे. या तक्रारींची चौकशी सुरू असतानाच पीडित महिलेची ओळख उघड केल्याच्या आरोपाची आणखी एक तक्रार दाखल झाल्याने संबंधित पोर्टलच्या वृत्तांकनाच्या पद्धतीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.




Total Users : 621969