नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा):- नेवासा शहरात अतिक्रमण काढण्याच्या प्रशासकीय मोहिमेदरम्यान तणाव उसळला असून, याच वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे उपजिल्हाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्या गाडीवर संतप्त जमावाने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दगडफेकीमुळे गाडीच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने ऋषिकेश शेटे या हल्ल्यातून बालंबाल बचावले असून त्यांना दुखापत झाली नाही.
शहरातील ज्ञानेश्वर मंदिराच्या मुख्य रस्त्यावर नगरपंचायत चौक ते खोलेश्वर मंदिर दरम्यान असणाऱ्या हातगाड्या आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण तातडीने काढून घ्यावे, यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडून ध्वनिक्षेपकावरून वारंवार आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानुसार नगरपंचायतीचे कर्मचारी कारवाईसाठी नगरपंचायत चौकात गोळा झाले होते. त्याच वेळी तेथे फेरीवाले आणि स्थानिकांचा मोठा जमाव जमा झाला. या जमावाने प्रशासकीय कारवाईला तीव्र विरोध दर्शवत रोष व्यक्त केला.
वाद सुरू असतानाच भाजपचे उपजिल्हाध्यक्ष ऋषिकेश शेटे हे खासगी वाहनाने त्या मार्गावरून जात होते. त्यांना पाहताच, यांनीच प्रशासनाला सांगून हे अतिक्रमण काढायला लावले आहे, असा संशय व्यक्त करून जमाव आक्रमक झाला. काही क्षणांत परिस्थिती आणखी बिघडली आणि संतप्त जमावाने त्यांच्या गाडीला घेराव घातला. जमावातील काही इसमांच्या हातात दगड आणि वजन-मापे होती. त्यांनी अचानक गाडीवर हल्ला करून तोडफोड सुरू केली, ज्यामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले.
घटनास्थळी वाढत असलेला हिंसाचार आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत बळाचा वापर केला आणि आक्रमक जमावाला पांगवले. या तातडीच्या कारवाईमुळे जमावाच्या गराड्यात अडकलेल्या ऋषिकेश शेटे यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या संपूर्ण प्रकारानंतर नगरपंचायत प्रशासनाकडून कार्यालयीन अधीक्षक सागर झावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या गंभीर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी तातडीने नेवासा पोलीस ठाण्याला भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. तसेच सुरक्षेचा व तपासाचा सविस्तर आढावा घेतला. या घटनेनंतरही शहरातील बाजारपेठत शांततेत व सुरळीत सुरू होते.




Total Users : 623071