लोणी(जनता आवाज वृत्तसेवा) :- लोणी येथील कुरकुटे वस्ती शिवारातील शृंखला हॉस्टेलच्या मागील बाजूस रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शेतात पाणी भरत असलेल्या तरुणावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची थरारक घटना घडली. रविंद्र रावसाहेब शिंदे (वय २७) हे संतोष लक्ष्मण कुरकुटे यांच्या शेतजमिनीत पाणी भरत असताना बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. यावेळी त्यांच्या पत्नीही घटनास्थळी उपस्थित होत्या. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविंद्र शिंदे हे शेतात पाणी भरण्याचे काम करत असताना अचानक बिबट्या त्यांच्या जवळ आला आणि त्याने त्यांच्यावर हल्ला केला. अनपेक्षितपणे झालेल्या हल्ल्यामुळे शिंदे यांची धांदल उडाली. त्यांनी प्रसंगावधान राखत बिबट्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात ते जखमी झाले.
जखमी रविंद्र शिंदे यांना तातडीने प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मानद वन्यजीव रक्षक विकास म्हस्के, लोणी ग्रामपंचायत सदस्य प्रविण विखे आणि संदीप गोसावी यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.
दरम्यान, संबंधित परिसरात मादी बिबट्या आपल्या काही पिलांसह फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. पिलांसह असलेल्या मादी बिबट्याने आपल्या अधिवासाच्या सुरक्षेसाठी हल्ला केला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शृंखला हॉस्टेल परिसर, कुरकुटे वस्ती, लोणी-हसनापूर शिवार आणि लगतच्या शेतवस्त्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी, महिला, लहान मुले तसेच पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाने या परिसरात तातडीने पाहणी करून बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घ्यावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
बिबट्या व त्याच्या पिलांचा वावर नेमका कोणत्या भागात आहे, याबाबत वनविभागाने नागरिकांना माहिती देऊन जनजागृती करणे गरजेचे आहे. नागरिकांनी बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा अथवा त्याला हुसकावण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
रविंद्र शिंदे यांच्यावरील हल्ल्यामुळे परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या वाढत्या वावराची चिंता निर्माण झाली असून, वनविभागाच्या पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




Total Users : 624769