लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):- मोबाईल दुरुस्तीसाठी दिलेल्या फोनमधील वैयक्तिक फोटोचा गैरवापर करून एका महिलेचे फोटो नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याप्रकरणी लोणी पोलिसांनी मोबाईल रिपेअरिंग दुकानदाराविरोधात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
लोणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अशफाक मोहम्मद इसाक शेख (वय ३६, रा. लोणी खुर्द, ता. राहाता) याचे मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे. संबंधित महिलेने २०२४ मध्ये मोबाईल दुरुस्तीसाठी त्याच्याकडे दिला होता. त्यावेळी आरोपीने मोबाईलचा पासवर्ड व लॉकची माहिती घेतल्याचा आरोप आहे.
त्यानंतर आरोपीने महिलेच्या मोबाईलमधील काही वैयक्तिक फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये घेतले आणि ते नातेवाईकांना पाठविण्याची धमकी दिली. या धमकीच्या आधारे आरोपीने वेळोवेळी ऑनलाइन व रोख स्वरूपात सुमारे ५० हजार रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच ब्लॅकमेल करून महिलेच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ६४(२)(m), ७५(२), ७६, ७८(१), ३०८(२), ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी करीत आहेत. लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.




Total Users : 633372