लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):- दुचाकीवरून घरी जात असलेल्या नागेश लोट यांच्यावर चाकू, तलवार आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करणाऱ्या प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. आरोपीच्या चौकशीत हल्ल्यात सहभागी असलेल्या अन्य सात साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहेत.
लोणी येथील ब्राह्मणे वस्ती परिसरात ५ सप्टेंबर रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास ही घटना घडली होती. नागेश शंकर लोट (वय ३८, रा. लोणी) हे दुचाकीवरून घरी जात असताना दोन दुचाकींवरून आलेल्या चार ते पाच जणांनी त्यांना अडविले. त्यानंतर आरोपींनी चाकू, तलवार आणि लोखंडी रॉडने डोक्यावर व पाठीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते.
याप्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, कट रचणे आणि मारहाणीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपींना जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाला हल्ल्यातील मुख्य आरोपी गणेश उर्फ विकी आण्णासाहेब राक्षे (वय २८, रा. वेताळबाबा चौक, लोणी) हा लोणी येथील जनावरांच्या बाजारात पांढऱ्या रंगाच्या क्रेटा गाडीत थांबलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान राक्षे याने आपल्या सात साथीदारांसह नागेश लोट यांच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली. त्याच्या माहितीनुसार या गुन्ह्यातील इतर आरोपी निष्पन्न झाले असून, पुढील तपास लोणी पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी केली.




Total Users : 640803