spot_img
spot_img

प्रवरेच्या लेकीचा स्वीडनच्या संसदेत झेंडा! निला विखे-पाटील यांची ऐतिहासिक कामगिरी;  विखे-पाटील परिवाराच्या विचारांचा वारसा सातासमुद्रापार

अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगरच्या मातीशी नाते असलेल्या निला विखे-पाटील यांनी स्वीडनच्या राजकारणात ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. स्वीडनच्या ३४९ सदस्यीय संसदेत (रिक्सडॅग) त्यांची निवड झाली असून, १३ सप्टेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत त्यांनी ‘स्टॉकहोम सिटी’ मतदारसंघातून विजय मिळवला.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे-पाटील यांच्या कन्या असलेल्या निला यांच्या या यशामुळे विखे-पाटील कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचला आहे.

स्वीडनमध्ये जन्मलेल्या निला यांचे बालपणातील काही वर्षे अहमदनगरमध्ये गेली आहेत. आपल्या मुळांबद्दल बोलताना त्यांनी भारताविषयीचे प्रेम व्यक्त केले. “मला माझ्या आजोबांना अभिमान वाटेल असे काम करायचे आहे. माझे भारतावर आणि येथील मित्रांवर प्रचंड प्रेम आहे,” असे त्या म्हणाल्या.

निवडीनंतर बोलताना निला म्हणाल्या, “संसदेचा भाग होणे ही आनंदाची बाब आहे. शहर आणि देशाच्या विकासासाठी योगदान देण्यासाठी मी उत्सुक आहे. ज्यांना मतदान करता येत नाही, त्यांचा आवाज बनण्याची माझी इच्छा आहे. बालकल्याण आणि पर्यावरण हे माझे प्रमुख विषय असतील.”

विखे-पाटील घराण्याचा वारसा पुढे

निला विखे-पाटील या आशियातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या पणती, माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे-पाटील यांच्या नात आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुतणी तसेच डॉ. सुजय विखे पाटील यांच्या त्या बहिण आहेत .

वयाच्या १५ व्या वर्षी आजोबांनी राज्याचा अर्थसंकल्प वाचायला दिल्याची आठवण सांगताना निला यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख केला.

निला यांनी अर्थशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण घेतले असून, एमबीए पूर्ण केले आहे. यापूर्वी त्यांनी स्वीडनचे माजी पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्या प्रशासनात वित्त, कर आणि गृहनिर्माण विषयांवर राजकीय सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

स्टॉकहोम महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणूनही त्यांनी काम केले आहे. स्वीडनमधील ‘ग्रीन पार्टी’च्या त्या सक्रिय नेत्या असून, पर्यावरण, नवीकरणीय ऊर्जा आणि शाश्वत विकास हे त्यांच्या राजकीय कामाचे केंद्रबिंदू आहेत.

निला यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल ‘विखे-पाटील फाउंडेशन’चे अध्यक्ष अशोक विखे-पाटील यांनी आनंद आणि अभिमान व्यक्त केला.

नगर ते स्टॉकहोम… प्रवास प्रेरणादायी

सहकार, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा असलेल्या विखे-पाटील कुटुंबातील निला यांनी आता स्वीडनच्या सर्वोच्च लोकशाही संस्थेत प्रवेश केला आहे. रवरीच्या  मातीशी जोडलेले नाते कायम ठेवत त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात नवा अध्याय सुरू केला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!