पुणे( जनता आवाज वृत्तसेवा) :-ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्या तथा रयत शैक्षणिक संकुल, श्रीरामपूरच्या प्रमुख मीनाताई जगधने यांना ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षण रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील दीर्घकालीन, मूल्याधिष्ठित आणि नाविन्यपूर्ण योगदानाची दखल घेत ग्रीन वर्ल्ड संस्थेच्या वतीने हा सन्मान देण्यात आला.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, नऱ्हे-आंबेगाव (पुणे) येथे झालेल्या समारंभात महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर खिलारे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते मीनाताई जगधने यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रुजविलेल्या ‘रयत’ विचारांचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविणे हा होता. याच विचाराला आधुनिक काळातील तंत्रज्ञानाची जोड देत मीनाताई जगधने यांनी रयत शैक्षणिक संकुलाच्या विकासाला नवी दिशा दिली आहे.
विद्यार्थी केंद्रित शिक्षणाची वाटचाल
“मीनाताई जगधने यांचे कार्य विद्यार्थी केंद्रित आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देतानाच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे. समाज परिवर्तनाच्या दृष्टीने त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे,” असे मत डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले.
ज्ञानेश्वर खिलारे यांनी मीनाताईंच्या कार्याचा गौरव करताना सांगितले, “कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शैक्षणिक वारसा पुढे नेण्याचे काम त्या करत आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे ही त्यांची मोठी कामगिरी आहे.”
शिक्षण संस्थेच्या विकासाला आधुनिकतेची दिशा
मीनाताई जगधने यांच्या पुढाकारातून रयत संकुलात प्राथमिक शिक्षणापासून महाविद्यालयीन स्तरापर्यंत विविध आधुनिक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. संगणक शिक्षण, इंटरनेट सुविधा, इंटरॅक्टिव्ह पॅनेल, भाषा व गणित प्रयोगशाळा, एआय लॅब, खगोलशास्त्र प्रयोगशाळा, ई-कंटेंट स्टुडिओ आणि तारांगण यांसारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.
आठ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या एस. के. सोमय्या प्राथमिक विद्यालयात आज १८०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ‘वाचन कट्टा’च्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढविण्याचा प्रयत्न तसेच एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स आणि एमबीए यांसारख्या अभ्यासक्रमांच्या विकासातही त्यांचे योगदान राहिले आहे.
सेवा, साधेपणा आणि नवनिर्मितीचा ध्यास
कृषी उद्योजक उदय बोरावके यांनी मीनाताई जगधने यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना ‘मनस्वी शिक्षिका’ संबोधले. “वयाच्या ८५व्या वर्षीही त्यांची कार्यतत्परता आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी आहे,” असे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना मीनाताई जगधने म्हणाल्या, “कर्मवीरांचा सहवास पवार कुटुंबीयांना लाभला. त्यामुळे शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी गौरवाचा क्षण आहे.”
या वेळी सकाळ माध्यम समूहाचे प्रमुख प्रतापराव पवार, रयत शिक्षण संस्थेचे सचिव किशोरराजे निंबाळकर, प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांच्यासह रयत संकुलातील प्राचार्य डॉ. प्रवीण बडथे, प्राचार्य डॉ. संजय कांबळे, प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे, मुख्याध्यापक सुनील साळवे, मुख्याध्यापिका सोनाली पैठणे यांच्यासह शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
विविध घटकांतील मान्यवर उपस्थित होते.
शिक्षणाला केवळ रोजगाराचे साधन न मानता सामाजिक परिवर्तनाचे माध्यम मानणाऱ्या मीनाताई जगधने यांच्या कार्याचा हा सन्मान, ग्रामीण शिक्षण क्षेत्रातील एका दीर्घ आणि समर्पित प्रवासाची नोंद ठरतो.




Total Users : 652954