spot_img
spot_img

नेवाशात चोरट्यांचा धुमाकूळ; घरमालकाला बांधून घरात डांबले मध्यरात्री सहा सशस्त्र चोरट्यांचा हल्ला; १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास!

नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा):- नेवासा ,उस्थळ रोडवरील कदम वस्ती येथे सहा अनोळखी सशस्त्र चोरट्यांनी मध्यरात्री घरात घुसून घरमालकाला मारहाण केली. त्याचे हातपाय बांधून शस्त्रांचा धाक दाखवत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याची घटनासमोर आली आहे. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

सदर घटनेप्रकरणी विजय गोरक्षनाथ कदम (वय ४५, रा. उस्थळ रोड, कदम वस्ती, नेवासा खुर्द) यांनी नेवासा पोलिसांत फिर्याद दिली आहे. पत्नी माहेरी गेल्याने कदम हे घरात एकटे होते. दि.३ रात्री सुमारे ११ वाजता ते घराच्या पडवीत झोपले होते. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सहा अनोळखी व्यक्ती काठ्या, कोयते व लोखंडी रॉड घेऊन त्यांच्याजवळ आल्या. यातील एकाने कदम यांच्या डाव्या गुडघ्यावर लाकडी दांडक्याने मारले. हालचाल केल्यास जीवे मारण्याची धमकी देत त्यांना पालथे झोपण्यास सांगितले.दोघे जण त्यांच्याजवळ थांबले, तर चौघांनी घराची कडी तोडून आत प्रवेश केला व कपाटाची उचकापाचक केली. त्यानंतर कदम यांना घरात नेऊन हातपाय बांधले, पाठीवर मारहाण केली व घरात कोंडून ठेवले. त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन सर्वजण पसार झाले.

विजय कदम यांचे पुतणे गणेश राजेंद्र कदम यांनी घर उघडून त्यांचे हातपाय सोडवले. गणेश यांनी सांगितल्यानुसार, याच व्यक्तींनी जवळील काकासाहेब बाप्पू शिंदे व गोरख तुकाराम भालसिंग यांच्या घरांच्या दरवाजांचीही तोडफोड केली. त्यांच्या घरांतून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

कदम यांच्या घरातून १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ‘पोत’ (किंमत ८० हजार रुपये), एक ग्रॅम सोन्याची बाली (३ हजार), अर्धा ग्रॅम नथ (१ हजार ५००), अडीच ग्रॅम सोन्याची अंगठी (८ हजार), अर्धा ग्रॅम सोन्याचे कुडक (२ हजार), चांदीचे दागिने व अंगठ्या, पैंजणांच्या जोड्या (१० हजार) आणि २३ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला.

घटनेची माहिती मिळताच आमदार विठ्ठलराव लंघे, नगराध्यक्ष करणसिंह घुले व सुनीलराव वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले होते. श्वानाने चोरीच्या ठिकाणापासून काही अंतरापर्यंत माग काढल्याचे समजते.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप वसावे करीत आहेत.

दरम्यान, नुकतीच नेवासा खुर्दमधील रामभाऊ जगताप यांच्या घरफोडीची घटना ताजी असतानाच पुन्हा सशस्त्र चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!