अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):- शहरातील बालिकाश्रम रोड परिसरात ५५ वर्षीय व्यक्तीवर चाकूने जीवघेणा हल्ला करून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. रवींद्र रामभाऊ चव्हाण (वय ५५, रा. यश अपार्टमेंट, बोल्हेगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रवींद्र चव्हाण हे बालिकाश्रम रोड परिसरात असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात चव्हाण गंभीर जखमी झाले. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेत जखमी चव्हाण यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली. अचानक घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे बालिकाश्रम रोड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्ल्यामागे वैयक्तिक वाद आहे की अन्य काही कारण, तसेच आरोपी एकटा होता की त्याच्यासोबत आणखी कोणी होते? या सर्व बाबींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत. या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरोपी कधी पोलिसांच्या हाती लागतो? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




Total Users : 660810