संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- राष्ट्रीय महामार्गावरून पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत निष्काळजीपणे कंटेनर घुसवून चौघांचा मृत्यू आणि १५ ते १६ वारकऱ्यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी आरोपी चालकाला संगमनेर न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. छोटेलाल अलगु पाल असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
३ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील खंदरमाळवाडी शिवारातून वारकऱ्यांची दिंडी पायी जात होती. त्यावेळी छोटेलाल पाल याने कंटेनर अत्यंत बेदरकारपणे व निष्काळजीपणे चालवत थेट वारकऱ्यांच्या दिंडीत घुसविला. या भीषण अपघातात कंटेनरखाली चिरडून चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर सुमारे १५ ते १६ वारकरी गंभीर जखमी झाले. कंटेनर पालखी रथावरही जाऊन आदळला.
घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चालकाला स्थानिक ग्रामस्थांनी पकडून घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४, २७९, ३३७, ३३८ तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष बी. खेडकर यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास केला. आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. आर. नेरलेकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. फिर्यादी, साक्षीदार, पंच तसेच तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी छोटेलाल पाल याला भारतीय दंड विधानाच्या कलम २३५(२) अन्वये विविध कलमांतर्गत दोषी ठरविले.
न्यायालयाने कलम ३०४ अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास, कलम ३३८ अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास, कलम ३३७ अंतर्गत पाच महिने सश्रम कारावास आणि कलम २७९ अंतर्गत चार महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि १३४(अ)(ब)/१७७ अन्वये प्रत्येकी दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. या सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत.
या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रेश्मा जाधव यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज पाहिले. घारगाव पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार प्रवीण डावरे आणि सहाय्यक फौजदार सुरेश टकले यांनी खटल्याच्या यशासाठी मोलाची भूमिका बजावली.
आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यात यश मिळाल्याबद्दल पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोराडे यांनी तपास पथक तसेच सरकारी अभियोक्त्यांचे विशेष अभिनंदन केले.




Total Users : 660753