कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा):- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण काल (दि. १९) कोल्हार-भगवतीपूर येथील बसस्थानक परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे संपूर्ण कोल्हार परिसर शिवमय झाला होता. शिवप्रेमी, ग्रामस्थ आणि युवकांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा, स्वराज्याच्या विचारांचा आणि त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा जयघोष करण्यात आला.
या सोहळ्यास राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने दोन्ही मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. भास्करराव खर्डे यांनी प्रास्ताविकातून या ऐतिहासिक सोहळ्यामागील भूमिका विशद केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करताना ना. विखे पाटील यांनी महाराजांचे विचार आणि स्वराज्याची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी, स्वराज्यनिष्ठा आणि लोककल्याणकारी विचार आजही समाजाला दिशादर्शक ठरत आहेत. महाराजांचे स्मारक समाजातील सर्व घटकांना प्रेरणा देणारे केंद्र ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा संकल्प ना. विखे पाटील यांनी व्यक्त केला.
केवळ स्मारके उभारण्यापुरते मर्यादित न राहता छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणणे आणि त्यांच्या आदर्शांनुसार समाजहितासाठी कार्य करणे आवश्यक आहे. महाराजांच्या विचारांचा वारसा जपून तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या ऐतिहासिक सोहळ्याला सामाजिक बांधिलकीची जोड देत कोल्हार येथील युवकांनी दुष्काळमुक्तीच्या उद्देशाने मुख्यमंत्री सहायता निधीस एक लाख ५० हजार रुपयांचा धनादेश प्रदान केला. युवकांच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांपासून प्रेरणा घेत समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शिवजयंती महोत्सव समिती आणि कोल्हार व्यापारी असोसिएशनच्या वतीने उपस्थित शिवप्रेमींना पेढेवाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे सोहळ्याच्या आनंदात आणखी भर पडली. शिवरायांच्या जयघोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात उपस्थितांनी या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा केला.
या कार्यक्रमास डॉ. सुजय विखे पाटील, डॉ. भास्करराव खर्डे, पांडुरंग पा. खर्डे, कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील, देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे, साहेबराव दळे, कृषिभूषण राजेंद्र कुंकुलोळ, अशोक असावा, शिवजयंती महोत्सव समितीचे सर्व सदस्य, कोल्हार व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी कोल्हारचे माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य अश्वारूढ पुतळा कोल्हारकरांच्या अभिमानाचे प्रतीक आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
शिवगर्जनाने सोहळ्यात भरला उत्साह
पुतळा अनावरण सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवगर्जना या भव्य मराठी लोकसंगीत कार्यक्रमाने उत्सवात विशेष रंग भरला. शिवरायांच्या पराक्रमाची गाथा आणि स्वराज्याच्या अभिमानाची अनुभूती देणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित शिवप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण परिसरात शिवभक्ती आणि स्वराज्याच्या अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.




Total Users : 665579