spot_img
spot_img

श्रीरामपूरकरांना आठ दिवसातून एकदा पाणी ३५ एकर तलावाचे काम रखडले;१५ एकर तलावातील १३ दिवसांच्या साठ्यावर शहराची तहान

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- वर्षभर मुबलक पाण्याची उपलब्धता असलेल्या श्रीरामपूर शहरावर यंदा जलसंकटाचे सावट निर्माण झाले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ३५ एकर क्षेत्रावरील मोठ्या तलावाच्या काँक्रिटीकरणाचे काम रखडल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. परिणामी, अवघ्या १५ एकर क्षेत्रातील छोट्या तलावातील शिल्लक पाणीसाठ्यावर शहराची तहान भागविण्याची वेळ आली असून, हा साठा केवळ १३ दिवस पुरेल इतकाच असल्याने नगर परिषदेला आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

बुधवारी होणारा पाणीपुरवठाही कमी दाबाने आणि मर्यादित स्वरूपात होणार असल्याने नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. आठ दिवसांचा पाणीसाठा घरात करून ठेवण्याचे मोठे आव्हान नागरिकांसमोर उभे राहिले आहे. विशेषतः झोपडपट्टी भागातील नागरिक, कष्टकरी आणि रोजंदारीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना या पाणी कपातीचा सर्वाधिक फटका बसणार आहे.

ड्रम, टाक्यांच्या खरेदीसाठी गर्दी

पाणी कपातीची माहिती मिळताच शहरातील नागरिकांनी पाणीसाठवणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. मंगळवारी विविध दुकानांमध्ये ड्रम, प्लास्टिक टाक्या आणि इतर साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले.

रखडलेल्या तलावकामामुळे संकट तीव्र

शहराचा भविष्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ३५ एकर तलावाचे काँक्रिटीकरण हाती घेण्यात आले होते. मात्र, हे काम वेळेत पूर्ण झाले नसल्याने त्याचा थेट परिणाम आता पाणीपुरवठ्यावर झाला आहे.

काम पूर्ण झाले असते तर आज शहरावर आठ दिवसांतून एकदा पाणी देण्याची वेळ आली नसती, अशी नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. विकासकामातील विलंबाचा फटका थेट सामान्य नागरिकांना सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

‘आठ दिवसांचे पाणी साठवायचे कुठे?’ बिहानींचा सवाल

नगर परिषदेकडून सोमवारी (दि. २७) सायंकाळी सोशल मीडियावर आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्याची माहिती देण्यात आली. या निर्णयावर भाजपचे नगरसेवक श्रीनिवास बिहानी यांनी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले.

“आठ दिवसांचे पाणी नागरिकांनी साठवायचे तरी कुठे? पाणीपुरवठ्यात बदल करण्यापूर्वी नागरिकांना पूर्वसूचना देणे आवश्यक होते. अचानक निर्णय जाहीर केल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे,” अशी टीका बिहानी यांनी केली.

पालकमंत्र्यांकडे मांडणार पाणीप्रश्न

शहरातील पाणी संकटावर तोडगा काढण्यासाठी येत्या एक-दोन दिवसांत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार असल्याचे बिहानी यांनी सांगितले. पाणीपुरवठ्याचे नियोजन सुधारावे आणि नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी मागणी करण्यात येणार आहे.

“नियोजनाच्या अभावामुळे श्रीरामपूरकरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. शहराची परिस्थिती गंभीर झाली आहे,” असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, शहराला आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्याची वेळ का आली, तलावाचे रखडलेले काम कधी पूर्ण होणार आणि पुढील काळासाठी प्रशासनाचे नियोजन काय, याकडे आता श्रीरामपूरकरांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!