श्रीरामपूर( जनताआवाज वृत्तसेवा):- शहरातील पाणीटंचाई ही नैसर्गिक नसून पालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा परिणाम आहे. शहरात आठ दिवसांनी एकदा पाणीपुरवठा होत असताना काही भागांत दिवसातून दोन वेळा पाणी दिले जात असल्याचा आरोप करत, नगराध्यक्ष करण ससाणे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून परिस्थिती सुधारावी, अन्यथा दिवाळीपूर्वी जनावरांसह श्रीरामपूर नगरपालिकेवर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिव प्रहार संघटनेने दिला.
शहरातील शासकीय विश्रामगृह येथे शिव प्रहार संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष तथा माजी पोलीस अधिकारी सुरज आगे यांनी ही भूमिका मांडली. यावेळी चंदू आगे, ॲड. अक्षय आगे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
आगे म्हणाले, शहरावर आलेले पाणीसंकट हे मानवनिर्मित असून पालिकेच्या चुकीच्या नियोजनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. शहराला मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी नगरपालिकेची असताना नगराध्यक्ष जबाबदारी झटकत आहेत. श्रीरामपूरच्या इतिहासात प्रथमच नागरिकांवर आठ दिवसांनी पाणी मिळण्याची वेळ आली असून, त्याला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
शहरातील गुलशन मशीद परिसरासह काही भागांत दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा होत असताना प्रभाग क्रमांक एक व दोनसह अनेक भागांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. काही भागांत पालिकेच्या टँकरद्वारे घरपोच पाणी दिले जात असताना इतर नागरिकांना खासगी टँकरसाठी पैसे मोजावे लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
नगराध्यक्ष करण ससाणे व आमदार हेमंत ओगले यांच्यावर टीका करताना आगे म्हणाले, शहरातील पाणीप्रश्न सोडविण्याऐवजी राजकीय स्वार्थाला प्राधान्य दिले जात आहे. पाणीटंचाईसारख्या गंभीर प्रश्नावर तातडीने उपाययोजना कराव्यात. अन्यथा जनतेची माफी मागून पदाचा राजीनामा द्यावा.
शिव प्रहार संघटनेने दिवाळीपूर्वी शहरातील पाणीपुरवठ्याचे प्रभावी नियोजन करावे, तलावात प्रथम पाणी साठवून नंतर काँक्रिटीकरणाचे काम करावे, मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत जोडण्या तातडीने तोडाव्यात आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांची नळपाणीपट्टी माफ करावी, अशा मागण्याही केल्या.
मागण्या मान्य न झाल्यास दिवाळीपूर्वी जनावरांसह श्रीरामपूर नगरपालिकेवर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने पत्रकार परिषदेत दिला.




Total Users : 673611