spot_img
spot_img

खांबा गावाच्या जलसिंचन योजनेच्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश ! आ. अमोल खताळ संतप्त; गाडलेली संपूर्ण पाइपलाइन उकरून दर्जा तपासण्याचे आदेश, ठेकेदारावर कायदेशीर कारवाईच्या सूचना

संगमनेर(जनता आवाज वृत्तसेवा):- संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खांबा गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी मुळा धरणातून सुमारे सहा किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याच्या उद्देशाने कामधेनू उपसा जलसिंचन योजना मंजूर करण्यात आली आहे. मात्र, या योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केल्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत आमदार खताळ यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच, जमिनीत गाडलेली संपूर्ण पाइपलाइन उकरून प्रत्यक्ष कामाचा दर्जा तपासण्याचे स्पष्ट निर्देश दिले. कामात अनियमितता आढळल्यास संबंधित ठेकेदार कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

खांबा गावासाठी सन २०२४ मध्ये सुमारे १६ कोटी रुपये खर्चाची कामधेनू उपसा जलसिंचन योजना मंजूर करण्यात आली. मात्र, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून या योजनेचे काम सुरू असूनही अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत आणि विलंबाबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.योजनेच्या कामाची पाहणी करताना संबंधित पाइपलाइनचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे ग्रामस्थांनी आमदार खताळ यांच्या निदर्शनास आणून दिले. पाइपलाइनच्या कामातील त्रुटींबाबत ग्रामस्थांनी प्रत्यक्ष परिस्थिती दाखवत आपली भूमिका मांडली. तसेच, जलसंधारण विभागाला कोणतीही पूर्वकल्पना न देता संबंधित ठेकेदाराने पाइपलाइनचे काम जमिनीत बुजवून टाकल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला.

या तक्रारींची दखल घेत आमदार खताळ यांनी केवळ वरवरची पाहणी करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कामाची सत्य परिस्थिती समोर आली पाहिजे, अशी भूमिका घेतली. संबंधित ठेकेदाराने जमिनीत गाडलेली संपूर्ण पाइपलाइन उकरून काढावी आणि तिच्या कामाचा दर्जा तपासून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, असे निर्देश त्यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

योजनेच्या कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. कामात हलगर्जीपणा किंवा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित ठेकेदाराविरुद्ध रीतसर कायदेशीर कारवाई करावी. तसेच, पाइपलाइनच्या कामासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री जप्त करण्याबाबतही आवश्यक ती कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग गायसमुद्रे, कनिष्ठ अभियंता सनी पगार आणि शाखा अभियंता शुभम गाडेकर उपस्थित होते. आता आमदार खताळ यांच्या निर्देशानंतर संबंधित विभागाकडून काय कारवाई केली जाते आणि ठेकेदारावर कोणती कारवाई होते, याकडे खांबा ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!