spot_img
spot_img

शिक्षक संघटनांच्या नेत्यांची चौकशी करा – दौलतराव उगले  मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):-  शिक्षक संघटनांच्या नावाखाली काही शिक्षक नेत्यांकडून शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आणि जिल्हा परिषद प्रशासनाची बदनामी केली जात असल्याचा आरोप करत, संबंधित शिक्षक नेत्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी दौलतराव विठ्ठल उगले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात उगले यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन कामकाजामुळे शिक्षकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर चार नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेसमोर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, हा मोर्चा शासनमान्यता नसलेल्या शिक्षक संघटनांच्या माध्यमातून काढण्यात आल्याचा दावा उगले यांनी निवेदनात केला आहे.

या मोर्चाच्या माध्यमातून काही शिक्षक नेत्यांनी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्यावर आरोप करून त्यांची बदनामी केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. मिशन आरंभ, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि स्कॉलरशिप परीक्षांमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे. नवोदय विद्यालयाच्या ६० पात्र जागांपैकी ५७ विद्यार्थ्यांची निवड जिल्हा परिषद शाळांमधून झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्याऐवजी त्यांच्यावर वैयक्तिक आरोप करून बदनामी करण्याचे प्रकार योग्य नसल्याची भूमिका उगले यांनी मांडली आहे. तसेच काही शिक्षक संघटनांच्या नेत्यांच्या व्यसनाधीनतेबाबत गंभीर आरोप करत, संबंधितांची चौकशी करावी, आवश्यक वैद्यकीय तपासणी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

शिक्षक पेशाची प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रशासनाने अशा प्रवृत्तींना आळा घालावा. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांना आणि अधिकाऱ्यांना पाठबळ द्यावे, असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती ज्येष्ठ समाजसेवक अञ्णा हजारे यांच्यासह प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!