देवळाली प्रवरा(जनता आवाज वृत्तसेवा):- राहुरी फॅक्टरी येथे आज दुपारी विद्युत रोहित्र (डीपी) बदलण्याचे काम सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने प्रकाश देशमुख या खासगी कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ठेकेदाराच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
महावितरणच्या ठेकेदार यांच्या कामावर प्रकाश देशमुख कार्यरत होते. देशमुख हे यापूर्वी वाहनचालक म्हणून काम करत होते. वाहनचालकाचे काम सोडल्यानंतर ते विद्युत रोहित्र दुरुस्ती व देखभालीच्या कामावर रुजू झाले होते, अशी माहिती समोर येत आहे.
विद्युत कामाचा पुरेसा अनुभव नसलेल्या कर्मचाऱ्याला डीपी बदलण्यास पाठविण्यात आले होते का? काम सुरू करण्यापूर्वी विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद केला होता का? सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.
या दुर्घटनेत एका कामगाराचा जीव गेल्याने विद्युत कामांमधील सुरक्षितता, ठेकेदारांची जबाबदारी आणि कामगारांना दिले जाणारे प्रशिक्षण याबाबत सखोल चौकशी होण्याची मागणी होत आहे.
घटनास्थळी महावितरणाचे अधिकारी दाखल झाले असून त्यांनी प्राथमिक तपासणी करुन सुरक्षा उपकरणे वापरली की नाही याची खात्री केली.नगर व पुणे येथिल एक पथक येणार असून त्या ठिकाणची तपासणी केल्या नंतर अपघाताचे खरे कारण समोर येणार आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी देवळाली प्रवराच्या महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना भ्रमणभाषवर संपर्क साधला परंतू एकाही अधिकाऱ्यांने भ्रमणभाष उचलला नाही.




Total Users : 683165