श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ) :-श्रीरामपूर शहरातील साखर कामगार हॉस्पिटल येथे एका अनोळखी इसमाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या ठाणे दैनंदिनी नोंदीनुसार, दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी आकस्मिक मृत्यू रजिस्टर क्रमांक १२९/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अनोळखी इसमाला उपचारासाठी साखर कामगार हॉस्पिटल, श्रीरामपूर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून मृत्यूची माहिती पोलिसांना देण्यात आली.
दरम्यान, सदर मृत व्यक्तीसोबत तीन चाकी सायकल असल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली आहे. या माहितीच्या अनुषंगाने श्रीरामपूर शहर पोलीस प्रशासनाकडून संबंधित तीन चाकी सायकलबाबतही चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे या सायकलीच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख पटविण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्याने, या व्यक्तीला ओळखणाऱ्या नातेवाईकांनी, परिचितांनी अथवा नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार भडकवाड करीत आहेत. मृत व्यक्तीबाबत किंवा त्याच्यासोबत असलेल्या तीन चाकी सायकलबाबत कोणाकडेही माहिती असल्यास त्यांनी तातडीने श्रीरामपूर शहर पोलिसांना कळवून तपासात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




Total Users : 683187