कुकाणा( जनता आवाज वृत्तसेवा):- घरातून गांजाची विक्री करणाऱ्या कुकाणा (ता. नेवासा) येथील संशयितावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. या कारवाईत ११ किलो १८२ ग्रॅम गांजा, वजन काटा व इतर साहित्य असा एकूण ५ लाख ६० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १९ नोव्हेंबर रोजी नेवासा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायाची माहिती घेत असताना कुकाणा येथील मुलाणीवाडा परिसरात एका घरातून गांजाची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती नेवासा पोलिसांना कळवून पंचांसमक्ष कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी शाहमद मेहबुब शेख (वय ४८, रा. मुलाणीवाडा, जुम्मा मस्जिदजवळ, कुकाणा) याच्या घराची झडती घेतली असता तीन गोण्यांमध्ये भरलेला ११.१८२ किलो गांजा आढळून आला. तसेच वजन काटा, वजन मापे, स्टीलचे भांडे आणि प्लास्टिक पिशव्या असा साहित्यसाठाही जप्त करण्यात आला.
पोलिस चौकशीत शेख याने हा गांजा मल्हारी मोहन बोरुडे (रा. मजलेशहर, ता. शेवगाव) याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी बोरुडे यालाही ताब्यात घेतले.
या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क), २०(ब), २०(२)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीष भोये आणि त्यांच्या पथकाने केली.
गांजा विक्रीचे केंद्र उद्ध्वस्त
कुकाणा परिसरात घरातून सुरू असलेल्या गांजा विक्रीच्या प्रकारावर स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमुळे अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.




Total Users : 684962