spot_img
spot_img

अहिल्यानगर-पाथर्डीतील चेनस्नॅचिंग टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ३ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त, चार गुन्हे उघडकीस

अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा):-  महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पसार होणाऱ्या चेनस्नॅचिंग टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. एका आरोपीला ताब्यात घेत पोलिसांनी अहिल्यानगर आणि पाथर्डी येथील चार गुन्ह्यांची उकल केली असून, ३ लाख २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत.

अहिल्यानगर शहरातील लिंकरोड ते गायकेमळा रस्त्यावर १ नोव्हेंबर रोजी दोन महिला दुचाकीवरून जात असताना एका महिलेच्या गळ्यातील दागिने चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले होते. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मालमत्तेविरोधातील गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, केडगाव परिसरातून विनोद उर्फ जोल्या जिजाबा भोसले (वय २६, रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदारांसह चेनस्नॅचिंग केल्याची माहिती दिली.

या टोळीत सुमित नितीन चव्हाण, रोहित नितीन चव्हाण (दोघे रा. केडगाव, अहिल्यानगर) आणि शुभम गहिनीनाथ भोसले (रा. बेलगाव, ता. कर्जत) यांचा सहभाग असल्याचे समोर आले असून, हे तिघे फरार आहेत.

आरोपींकडे केलेल्या चौकशीतून पाथर्डी पोलिस ठाण्यातील एक आणि कोतवाली पोलिस ठाण्यातील तीन अशा एकूण चार गुन्ह्यांची उकल झाली आहे.

पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचे मिनी गंठण, मंगळसूत्र, पेंडल, सोन्याचे तुकडे, विनानंबर मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण ३ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी दिल्याच्या माहितीवरून अंबादास दगडू पांडुळे (वय ५१, रा. चिखली, ता. आष्टी) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे आणि पथकातील पोलीस अंमलदारांनी केली.

फरार आरोपींचा शोध सुरू असून, जिल्ह्यातील आणखी काही गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!