श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- अल्पावधीत दुप्पट-तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ‘ग्रो इन्व्हेस्टर’ प्रकरणातील दोन फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी अहिल्यानगर पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. आरोपींबाबत खात्रीशीर माहिती देणाऱ्या व्यक्तीस २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले असून, माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, भोकर (ता. श्रीरामपूर) येथील ‘ग्रो इन्व्हेस्टर’ कंपनी अल्पावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने २६ डिसेंबर २०२५ रोजी छापा टाकून मोठी कारवाई केली होती.
या कारवाईत पासबुक, चेकबुक, हिशोबाच्या वह्या, लॅपटॉप, संगणक साहित्य, पेनड्राइव्ह, कॅश काउंटिंग मशीन, तिजोरी, वॉकीटॉकी आणि १ लाख ४ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर काही ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्यात आले. मात्र, अनेक गुंतवणूकदारांचे पैसे अद्याप अडकले असून, मुख्य आरोपी अमोघ संदिप कपाटे (वय २४) आणि संदिप मोहिनीराज कपाटे (वय ३६) हे फरार आहेत.
पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी आरोपींबाबत ठोस आणि तपासासाठी उपयुक्त माहिती देणाऱ्यास २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. तसेच आरोपींना आश्रय किंवा मदत करू नये, त्यांच्याकडून फसवणूक झालेल्या नागरिकांनी तातडीने पुढे यावे आणि अल्पावधीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखविणाऱ्या कोणत्याही योजनेत पैसे गुंतवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आरोपींबाबत माहिती असल्यास नागरिकांनी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाणे किंवा संबंधित पोलिस अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




Total Users : 685924