पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- हंगा तलावातील पाणीसाठा संपल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या संकटातून पारनेर शहराला बाहेर काढण्यासाठी खासदार नीलेश लंके यांनी पुढाकार घेतला आहे. सुपा एमआयडीसीच्या पंप हाऊसवरून पारनेर शहराला पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
पारनेर नगरपंचायतीच्या नगरसेवकांसह खासदार लंके यांनी अहिल्यानगर येथील एमआयडीसी कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली. शहराची सध्याची पाणी परिस्थिती मांडत दररोज आठ लाख लिटर पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हंगा तलाव आटल्याने टंचाईची झळ
पारनेर शहरासह हंगा व लोणीहवेली गावांना हंगा तलावातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, जुलै महिन्याच्या अखेरीस तलावातील पाणीसाठा संपल्याने नियमित पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
सध्या शहराला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, नागरिकांची वाढती गरज लक्षात घेता टँकरची व्यवस्था अपुरी ठरत असून, पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
एमआयडीसीच्या पाण्याचा पूर्वीही उपयोग
पारनेर शहराला टंचाईच्या काळात सुपा एमआयडीसीमधून पाणीपुरवठा करण्यास २००६-०७ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी एमआयडीसीच्या पंप हाऊसवरून नगरपंचायतीच्या पंप हाऊसपर्यंत पाणीपुरवठा करण्यात आला होता.
यंदा पुन्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शहरासाठी एमआयडीसीच्या पाण्याचा पर्याय पुढे आला आहे.
सहा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठ्याचे नियोजन
नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी प्रियांका शिंदे यांनी एमआयडीसीच्या उपअभियंत्यांना निवेदन देऊन दररोज आठ लाख लिटर पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
हे पाणी उपलब्ध झाल्यास शहराला किमान सहा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा करणे शक्य होणार असून, टँकरवरील अवलंबित्व कमी होणार आहे. मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत सुपा एमआयडीसीच्या पंप हाऊसवरून टँकरद्वारे पाणी आणण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे.
पाणीप्रश्नावर बैठकीत सविस्तर चर्चा
पारनेर नगरपंचायतीने यापूर्वी १ ऑक्टोबर रोजी एमआयडीसीकडे पाण्याची मागणी केली होती. त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी खासदार नीलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहराच्या पाणीटंचाईवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस एमआयडीसीचे उपअभियंता सरदार अनुसे, माजी नगराध्यक्ष नितीन अडसूळ, अर्जुन भालेकर, बाळासाहेब कावरे, बाळासाहेब नगरे, राजू शेख, भूषण शेलार, विजय भास्कर औटी, ऋषिकेश गंधाडे, अभियंता क्रांती वाघमळे, अभियंता गोरे, मारुती ठोंबरे आदी उपस्थित होते.
एमआयडीसीकडून पाणी उपलब्ध होण्याच्या निर्णयाकडे आता पारनेर शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.




Total Users : 686990