spot_img
spot_img

अहमदनगरचे नाव आता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

चौंडी (प्रतिनिधी):-पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 298व्यां जयंती निमित्ताने अहमदनगर जिल्ह्याचे नाव राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई नगर करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

ते अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे आयोजित जयंती उत्सव समितीच्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर महसुल, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील, खा.सदाशिव लोखंडे, आमदार बबनराव पाचपुते, मोनिका राजळे,सुरेश धस,गोपीचंद पडळकर,राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करा अशी मागणी या जिल्ह्यातील तसेच धनगर समाजाची होती, या मागणीचा सकारात्मक विचार करून आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 298व्यां जयंतीच्या निमित्ताने ही भेट आपण देत असल्याचे सांगून अहिल्यादेवी यांच्या सारखाच राज्य कारभार आमचेही सरकार करेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा हा अनेक वर्षा पासून चांगलाच उमटला असून यातूनच प्रेरणा घेवून दीन,दुबळे, वंचित यांच्यासाठी आमचे सरकार अहोरात्र काम करत आहे. आहिल्यादेवी यांनी आपल्या राज्यकारभारात सर्वसामान्यांना ज्या पद्धतीने न्याय दिला त्याच प्रमाणे आम्ही देखील सर्वसामान्यांना न्याय देत आहोत. राजमाता होळकर यांनी शेतकऱ्यांसाठी आपल्या कारभारातून काहीही कमतरता भासू दिली नाही तशीच आम्ही देखील शेतकऱ्यांना कमतरता भासू देणार नाही म्हणूनच नमो शेतकरी सन्मान योजना आम्ही सुरू केली. आता शेतकऱ्यांना दरवर्षी 12हजार रुपये मिळणार. केंद्राच्या योजने सारखीच आम्ही देखील ही योजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा दिला. याबरोबरच एक रुपयात पीक विमा देखील आपण देत आहोत. त्यामुळं कल्याणकारी सरकार ही अहिल्यादेवी यांची संकल्पना आम्ही प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
चौंडी येथील अहिल्यादेवी यांच्या स्मृतीस्थळाला आल्यावर एक ऊर्जा, प्रेरणा, वारसा आणि गरिबांचे कल्याण करण्याचा वसा हा मिळत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून धनगर समाजाच्या कल्याणा करिता पुण्यश्लोक अहिल्याबाई शेळी मेंढी पालन महामंडळाची स्थापना करून दहा हजार कोटी रुपयांचा निधी देखील दिल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय धनगर समाजासाठी दरवर्षी पंचवीस हजार घर बांधून देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. आमचे सरकार हे केलेल्या घोषणा पूर्ण करणारे सरकार आहे. त्यामुळे तुमच्या सर्व मागण्याचा सकारात्मक विचार आम्ही केला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 
 यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नगर जिल्हा वासियांच्या वतीने लक्ष लक्ष आभार व्यक्त केले. एवढंच नाहीतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी पालन महामंडळास दहा हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल शतशः आभार व्यक्त करत केले. राज्य शासन धनगर समाजासाठी दरवर्षी 25000 घर बांधून देणार ह्या महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्या बद्दल सरकारचे आभार व्यक्त करून धनगर समाजाला या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. 
 या जयंती उत्सव समिती कार्यक्रमाचे प्रास्तविक आ. प्रा.राम शिंदे यांनी केले. आ. गोपीचंद पडळकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या जयंती उत्सव कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्याबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!